

पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : शेतमाल वाहतूक करण्यासाठी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ये-जा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असलेल्या फाकटे ते वडनेर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. पावसाळ्यातील दिवसांत या रस्त्याने पायी चालत जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असून, अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेल्या या रस्त्याचे काम न झाल्यास अथवा ये-जा करण्यासाठी रस्त्याची डागडुजी न केल्यास उपोषण करण्याचा इशारा फाकटे (ता. शिरूर) येथील तरुणांनी दिला आहे.
शिरूर तालुक्यातील बेट भागात राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून मंजूर कोट्यवधी विविध विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटने नुकतीच झाली. मात्र, गेली अनेक वर्षांपासून खडीकरण व डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असलेले अनेक रस्ते निधीशिवाय प्रतीक्षेत असलेले दिसून येत आहे. याबाबत फाकटे ते वडनेर खुर्द (इजिमा 151) या रस्त्यासाठी अनेकदा निधीची मागणी करण्यात येत आहे. मात्र गेली 40 वर्षांपासून कोणताही स्थानिक पदाधिकारी याकडे लक्ष देत नसून, संबंधित भागाच्या लोकप्रतिनिधीना वारंवार भेटून निधीची मागणी करूनही रस्ता दुर्लक्षित आहे.
मोठ-मोठ्या खड्यांमुळे स्थानिकांना येथून प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जांबूत ते काठापूर खुर्द रस्ता, जांबूत ते फाकटे मार्गे कवठे येमाई रस्ता, फाकटे- वडनेर खुर्द रस्ता व पिंपरखेड मार्गे चांडोह ते फाकटे रस्ता हे मार्ग गेली अनेक दिवसांपासून रुंदीकरण व डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. स्थानिक पदाधिकार्यांनी केवळ श्रेयवाद न करता तसेच पदांचा उपभोग न घेता या विकासकामांसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
श्रेयवादामुळे रखडतोय विकास
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून मोठा निधी या भागात येत आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक गावांत राजकीय सुडापोटी विविध पक्षांत अनेक गट-तट निर्माण झाल्याने अनेकदा स्थानिक श्रेयापोटी विकासकामांसाठी निधी येण्यास अडथळा निर्माण होत आहे.
हेही वाचा :