मंचर: यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नारळाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. दोन महिन्यांपूर्वी लहान नारळ 20 ते 25 रुपये, तर मध्यम आकाराचे नारळ 40 ते 45 रुपये दराने उपलब्ध होते. मात्र, सध्या लहान नारळ 30 ते 35 रुपये, तर मोठे नारळ तब्बल 55 ते 60 रुपयांपर्यंत विकले जात आहेत. म्हणजेच अल्पावधीतच भाव जवळपास दुप्पट वाढले आहेत.
भाववाढीमागे अनेक कारणे असून कर्नाटक व तामिळनाडूतील उत्पादन घटल्याने महाराष्ट्रात पुरवठा कमी झाला आहे. त्यातच वाहतूक खर्च, मजुरी दर आणि मध्यस्थांचा नफा या घटकांमुळेही दर वाढले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात पूजा, नैवेद्य, प्रसाद, तुळशीव्रत आदी सर्वच धार्मिक कार्यांसाठी नारळाची अनिवार्य मागणी असते. परिणामी घोडेगाव, मंचर आदी प्रमुख बाजारपेठांत विक्रीचा वेग वाढला असून दररोज हजारो नारळांचा खप होत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या नारळांचा तुटवडा जाणवत असून, ग्राहकांना उंच दर मोजावे लागत आहेत.
गणेशोत्सव हा भक्तीचा सण असला तरी दरवर्षी नारळासह पूजासाहित्यातील भाववाढ ग्राहकांवर आर्थिक बोजा ठरते.
व्यापार्यांचे म्हणणे आहे की, उत्पादन कमी आणि मागणी प्रचंड असल्यामुळे दर वाढणे अपरिहार्य आहे. मात्र प्रशासनाने बाजारभावांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी ग्राहकांकडून होत असून येत्या काही दिवसांत नारळाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे, असे मंचर येथील दुकानदार प्रवीण शिंदे यांनी सांगितले.