

सुषमा नेहरकर-शिंदे
राजगुरुनगर: जिल्ह्यात आदिवासी समाजाची (अनुसूचित जमातीची) सर्वाधिक लोकसंख्या जुन्नर तालुक्यात असल्याने जिल्हा परिषदेसाठी दोन गट आणि पंचायत समितीसाठी तब्बल चार गण अनुसूचित जमातीसाठी राखीव होणार आहेत.
यामध्ये जुन्नर तालुक्यात 8 जिल्हा परिषद गटांपैकी डिंगोरे आणि बारव हे गट राखीव लोकसंख्येच्या उत्तरत्या क्रमांकानुसार अनुसूचित जमातीसाठी राखीव होणार आहेत. यामुळे आदिवासी समाजातील अनेक तरुण उमेदवारांना राजकारणात उतरण्याची संधी उपलब्ध होणार आहे. याच वेळी मतदारसंघातील खुल्या प्रवर्गाची मोठी लोकसंख्या असलेल्या गावातील ओपनच्या अनेक इच्छुकांचा पत्ता निवडणुकीच्या रिंगणातून कट होणार आहे. (Latest Pune News)
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची तब्बल चार-पाच वर्षांपासून इच्छुक उमेदवार वाट पाहत होते. न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाला या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे भाग पडले असून, गट-गणरचना अंतिम झाली आहे. गणेश विसर्जनानंतर प्रशासन आरक्षण सोडत जाहीर करेल, त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
परंतु, शासनाच्या नवीन नियमानुसार या वेळी जिल्ह्यात पूर्वीची चक्राकार पद्धत रद्द करून पूर्णपणे नव्याने व लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीची लोकसंख्या व त्याचा उतरता क्रम प्रशासनाने जाहीर केला आहे. यामध्ये जुन्नर तालुक्यातील डिंगोरे आणि बारव हे दोन जिल्हा परिषद गट अनुसूचित जमातीसाठी राखीव होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या या गटातील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भाऊ देवाडे यांनी आपण स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनी आपला गट आरक्षित होत असल्याने जोरदार तयारी सुरू केली आहे. परंतु, या वेळी दोन्ही राखीव गटातून अनेक नवीन व तरुण आदिवासी चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये सुनीता बोर्हाडे, दत्ता गावरी, अजिंक्य घोलप यांची पत्नी नीलम घोलप-वायाळ, पंडित मामाणे, शंकर घोडे, भाऊ साबळे, तुळशीराम भोईर यांची नावे चर्चेत आहेत.
अनेक इच्छुकांची नाराजी
बारव गटामध्ये पिंपळगाव, मणिकडोह. खामगाव, तांबे, सुराळे, बेलसर या खुल्या वर्गांची लोकसंख्या अधिक असलेल्या मोठ्या गावांचा समावेश आहे. दुसरीकडे डिंगोरे गटामध्ये गोळेगाव, उदापूर, डिंगोरे, बल्लाळवाडी ही खुल्या समाजाची लोकसंख्या अधिक असलेली गावे आहेत. यामुळे या गावांमधून चंद्रकांत काजळे, महेंद्र सदाकाळ, अंकुश आमले, रोहिदास शिंदे या इच्छुकांचे पत्ते कट होणार आहेत. परिणामी, या इच्छुकांमध्ये नाराजी आहे.