

वेल्हे: खडकवासला धरणसाखळीतील सर्वाधिक पाणी साठवण क्षमतेचे वरसगाव (वीर बाजी पासलकर जलाशय) धरण मंगळवारी (दि. 2) दुपारी 100 टक्के भरले. खडकवासला धरणसाखळीची देखील शंभरीकडे वाटचाल सुरू असून, सायंकाळी पाच वाजता साखळीत 28.93 टीएमसी म्हणजे 99.24 टक्के साठा झाला आहे. (Latest Pune News)
रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील तव, धामण ओहोळ, टेकपोळे, दापसरेसह धरणक्षेत्रात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणसाखळीत 100 टक्के साठा करण्याचा निर्णय खडकवासला जलसंपदा विभागाने घेतला आहे. टेमघर 100 टक्के भरून वाहत आहे, तर पानशेतमध्ये 99.71 व खडकवासला धरणात 90.39 टक्के साठा झाला आहे.
पावसाचा जोर ओसरला असला तरी तुरळक पावसामुळे धरणसाठ्यात पाण्याची आवक सुरू आहे. वीजनिर्मिती केंद्राच्या सांडव्यातून 600 क्युसेक पाणी सोडूनही पाण्याची तूट भरून वरसगाव धरण दुपारी 100 टक्के भरले. पावसाचा जोर वाढल्यास वरसगाव धरणातून जादा पाणी मुख्य सांडव्यातून सोडले जाणार आहे.
- प्रतीक्षा रावण, शाखा अभियंता, वरसगाव धरण विभाग
पावसाचा शेवटचा टप्पा असल्याने धरणसाखळीत 100 टक्के साठा करण्यात येणार आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील एक कोटी नागरिकांना पिण्याचे तसेच जिल्ह्यातील 66 हजार हेक्टर शेतीला पुरेसे पाणी मिळणार आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास खडकवासलातून मुठा नदीत विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
- मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, खडकवासला जलसंपदा विभाग