बारामती: बारामती शहर व तालुक्यात सीएनजी इंधन पंपांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. ज्या पंपांवर सीएनजी दिला जातो तेथेही तो बहुतांश वेळा संपल्याची स्थिती निर्माण होते. परिणामी, वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. सीएनजी उपलब्ध झाला की पंपासमोर लांबच लांब लागणार्या रांगा हे आता नेहमीचे चित्र होऊन बसले आहे. सीएनजी संपला आहे, हे फलक पाहून वाहनचालक आता हैराण झाले आहेत.
बारामती शहरात बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ, बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थांच्या इंधन पंपावर सीएनजी उपलब्ध करून दिला जातो. एमआयडीसीत एका खासगी पंपावर ही व्यवस्था आहे. (Latest Pune News)
याशिवाय तालुक्याच्या ग्रामीण भागात निरा रस्त्यावर फक्त निंबुत येथेच समता पतसंस्थेच्या पंपावर सीएनजी विक्री होते, तर जेजुरी रस्त्यावर फक्त मोरगाव येथील पंपावर सीएनजीची व्यवस्था आहे. शहर व तालुक्यात इंधन पंपांची संख्या अधिक असताना ठरावीक सहा ते सात पंपांवरच सीएनजी उपलब्ध होत आहे.
थेट पाइपलाइन नसल्याने टँकरद्वारे बारामतीला सीएनजी सिलिंडर पुण्यातून आणले जातात. इथे ते खाली करून घेतले जातात. वाहतूक अंतर अधिक असल्याने वाहनांच्या खेपांवरही मोठी मर्यादा येते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि. 16) मुढाळे येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना भविष्यात प्रत्येक पंपावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा मानस व्यक्त केला. अलिकडील काळात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे पवार यांची ही कल्पना निश्चितच स्वागतार्ह आहे. परंतु, सध्या सीएनजीसाठीच नागरिकांना धावाधाव करावी लागत असून, आधी यातून मार्ग काढण्याची मागणी सीएनजी वाहनधारक करीत आहेत.
सीएनजी भरण्यासाठी करावी लागते कसरत
या सगळ्याचा मोठा मनस्ताप सीएनजीवरील वाहने असणार्या वाहनचालक, मालक यांना होत आहे. सीएनजी भरायचा म्हणजे आधीच तयारी करून ठेवावी लागत आहे. रात्री-अपरात्री पंपावर जाऊन वाहनात सीएनजी भरून ठेवावा लागतो. तत्काळ स्थितीत एखाद्याला कुठे जायचे म्हटले तर सीएनजी भरण्यातच त्याचा वेळ जातो. त्यामुळे सीएनजी भरणे म्हणजे एक कसरतच होऊन बसली आहे.
बारामतीसह परिसरात वाढली सीएनजी वाहने
गेल्या एक-दोन वर्षांत बारामती व परिसरात सीएनजी वाहने मोठ्या प्रमाणात नागरिकांनी घेतली आहेत. अगदी रिक्षापासून ते मोठ्या चारचाकी वाहनांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे सीएनजीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातुलनेत बारामतीसारख्या प्रगत भागात पुरेसे सीएनजी पंप उपलब्ध नाहीत. त्याचा मनस्ताप वाहनधारकांना होतो.
सीएनजी पंपांची संख्या वाढण्याची गरज
ज्या पंपांवर सीएनजी विक्री होते तेथील साठा अवघ्या काही तासांत संपतो. परिणामी, पंपावर सीएनजी उपलब्ध नसल्याचा फलक लावला जातो. अलिकडील काळात सीएनजीवरील दुचाकीसुद्धा काही कंपन्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिक अशा दुचाकी खरेदी करीत आहेत. त्यामुळे बारामतीसारख्या भागात सीएनजी पंपांची संख्या वाढण्याची गरज निर्माण झाली आहे.