ओतूर: जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण आणि परिसरात शुक्रवारी (दि. 16) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकर्यांचे लाखोंचे नुकसान झाले. अनेकांची पिके पाण्याच्या जोरदार प्रवाहाने वाहून गेली. कमलानगर परिसरात आदिवासी ठाकर समाजाचे शेतकरी विलास सबाजी डोके यांची टोमॅटोची बागच वाहून गेली. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
टोमॅटोच्या फळाने लगडलेली व येत्या काही दिवसांत काढणीला बाग डोळ्यांदेखत वाहून जाताना शेतकर्यांची मने हेलावून गेली. निसर्गाने दाखविलेल्या अक्राळविक्राळ रूपाने अल्पभूधारक शेतकरी हतबल झाला आहे. (Latest Pune News)
या भागात नुकसान झालेल्या पिकांचे, फळबागांचे शासनाने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत त्वरेने द्यावी, अशी मागणी अमृतेश्वर धर्मादाय संस्थेचे संचालक नीलेश महाले, आंबेगव्हाणचे माजी सरपंच निवृत्ती धराडे यांनी केली आहे.
आंबेगावच्या टोमॅटो बागांना पावसाचा फटका
गेल्या चार-पाच दिवसांपासून पडत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाचा फटका आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरातील टोमॅटो बागांना बसला आहे. या बागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने करपा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे आदी गावांमधील टोमॅटो बागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले आहे. सध्या टोमॅटोला बाजारभाव चांगले मिळत आहेत. परंतु, पावसाचा फटका टॉमेटो बागांना बसू लागल्याने टोमॅटो उत्पादक शेतकर्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
उन्हाळी हंगामात आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बहुतांश शेतकर्यांनी टोमॅटोचे पीक घेतले. यंदा सुरुवातीला टोमॅटोला बाजारभाव कमी मिळाला. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून टोमॅटोच्या बाजारभावात वाढ झाली आहे. सध्या टोमॅटो क्रेटला 20 किलोनुसार 300 रुपयांवर बाजारभाव मिळत आहे.
बाजारभावात वाढ होत चालल्याने टोमॅटो उत्पादक शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परंतु, गेल्या चार-पाच दिवसांपासून या परिसरात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. दररोज या परिसरात पाऊस पडत असल्याने टॉमेटो बागांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. सततच्या पावसामुळे टॉमेटो पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.