

पुणे: जिल्ह्यासह राज्यात झालेल्या पावसाच्या दमदार पुनरागमनाचा परिणाम पालेभाज्यांच्या उत्पादनावर झाला आहे. पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाले असून बहुतांश ठिकाणी काढणी न झाल्याने गुलटेकडी मार्केट यार्डातील पालेभाज्यांची आवक निम्म्यावर आली आहे.
शहरातील बाजारपेठांमध्ये दर्जेदार पालेभाज्यांचा तुटवडा जाणवत असून पालेभाज्यांच्या दरात तेजी आली आहे. पालेभाज्यांच्या भावात एका दिवसात दुपटीने वाढ झाली असून किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे भाव चाळीशीवर पोहोचले असून सर्वसामान्यांच्या ताटातून पालेभाज्या गायब झाल्या आहेत. (Latest Pune News)
पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील सासवड परिसर, हडपसर, उरळी कांचन, लोणी काळभोर, यवत परिसरात पालेभाज्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. तेथून शहरात पालेभाज्या विक्रीसाठी पाठविल्या जातात. याखेरीज, लातूर तसेच नाशिक परिसरातून कोथिंबीर मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होत असते.
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यात पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे, बाजारात पावसाचा मार बसलेल्या पालेभाज्या दाखल होत आहे. ज्याठिकाणी पाऊस कमी झाला आहे. तेथून दर्जेदार पालेभाज्यांची आवक होत आहे. मात्र, हे प्रमाण अवघे वीस टक्केच आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी मोठी असल्याने पावसाने भिजलेल्या पालेभाज्या पंधरा ते वीस रुपये तर दर्जेदार पालेभाज्या वीस ते चाळीस रुपयांना मिळत असल्याची माहिती किरकोळ पालेभाज्यांचे विक्रेते सचिन कुलट यांनी दिली.
पावसाच्या दमदार हजेरीमुळे पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजारात सर्व प्रकारच्या पालेभाज्यांची निम्म्यावर आली आहे. यामध्ये दर्जाहिन पालेभाज्यांचे प्रमाण जास्त आहे. स्वातंत्र्य दिन व साप्ताहिक सुट्टीमुळे रविवारी दर कमी मिळतील, त्यामुळे शेतकर्यांनी पालेभाज्या मोठ्या प्रमाणात शेतात राखून ठेवल्या होत्या. त्यात सोमवार सकाळपासूनच पावसाने सुरुवात केल्याने पालेभाज्या शेतातच खराब झाल्या आहेत. याखेरीज, ग्राहकाने खरेदी केल्यानंतर घरी जाईपर्यंत भिजलेल्या पालेभाज्याही खराब होत असल्याने खरेदीदारांनी खरेदीचे प्रमाण कमी केले आहे.
- राजेंद्र सूर्यवंशी, पालेभाज्यांचे व्यापारी, मार्केट यार्ड.
पावसामुळे बाजारात नेहमीच्या तुलनेत दर्जेदार पालेभाज्यां कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. भिजलेला आणि दर्जाहिन माल खरेदीदारांकडून कमी प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे. केवळ दर्जेदार मालाची खरेदीच ग्राहकांकडून करण्यात येत आहे. दर्जाहिन मालाची कमी भावाने विक्री होत आहे. त्याचा शेतकर्यांना फटका बसत असून, नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
- चरण वणवे, भाजी विक्रेते, शनिपार चौक.