

पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला, यामागे काही घातपात आहे का, याची सत्यता जनतेसमोर आली पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा. त्यात कोणी दोषी आढळल्यास त्यांना फासावर लटकवता आले पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली.
पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्याच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हा परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, "अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून आणखी मोठ्या कामांची अपेक्षा होती. त्यांच्या आठवणींनी मनात आनंद निर्माण होतो; मात्र ते आज आपल्यात नाहीत, याची वेदनाही आहे. पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन त्यांचा पुतळा उभारला आणि प्रवेशद्वाराला त्यांचे नाव दिले, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे."
"पुणे जिल्ह्याच्या विकासात अजित पवार यांचे योगदान अतुलनीय आहे. जिल्हा परिषदेला विकासाची दिशा देण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली सात ते आठ जिल्हा परिषद अध्यक्ष घडले. गावागावांत, वाड्या-वस्त्यांपर्यंत विकास पोहोचवण्याचा त्यांचा ध्यास होता. पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाच्या इतिहासात त्यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी नोंदवले जाईल," असेही त्यांनी नमूद केले.
"अजितदादा कणखर, शिस्तप्रिय आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेते होते. त्यांच्या शब्दांत ‘हो’ आणि ‘नाही’ असे दोनच पर्याय असायचे. जे पटेल त्याच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहायचे आणि जे पटणार नाही ते स्पष्टपणे सांगण्याची हिंमत त्यांच्यात होती. अर्थमंत्री म्हणून अनेक अर्थसंकल्प मांडताना त्यांनी आर्थिक शिस्त बिघडू दिली नाही. कामाचा दर्जा आणि त्यातून मिळणारा परिणाम यावर त्यांचा विशेष भर होता," असे फडणवीस यांनी सांगितले.
अजितदादांच्या कामाच्या शिस्तीचा उल्लेख करताना ते म्हणाले, "सकाळी सहा वाजता तयार होऊन सात वाजल्यापासून कामाला सुरुवात करणारे अजितदादा सर्वांनी पाहिले आहेत. मंत्रालयात सकाळी आठ वाजताही ते कामासाठी उपस्थित असायचे. त्यांचा कामाचा वेग, नेमकेपणा आणि निर्णयक्षमता ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती."
"अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची वस्तुस्थिती समोर आली पाहिजे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून आंतरराष्ट्रीय संस्थांच्या पथकांचीही मदत घेतली जात आहे. आठ ते दहा महिने उलटत आले असताना चौकशीचा अहवाल लवकर सादर व्हावा, अशी विनंती आपण अमित शहा यांच्याकडे केली आहे. त्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून अहवाल लवकर आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे," असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
"चौकशीच्या अहवालामुळे जनतेच्या मनातील संभ्रम दूर होईल. या प्रकरणात कोणी दोषी असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. तर हा केवळ अपघातच असल्याचे स्पष्ट झाल्यास जनतेच्या मनातील शंका आणि आक्रोश कमी होण्यास मदत होईल," असेही फडणवीस म्हणाले.