

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘संवाद पुणेकरां’शी या कार्यक्रमातून पुण्यासंदर्भातल्या विविध समस्या आणि त्यावरील उपाययोजनांसंदर्भात केलेले अभ्यासपूर्ण भाष्य आणि पुण्याच्या विकासाबद्दल मांडलेले सविस्तर ‘व्हिजन’पुणेकरांच्या पसंतीस पडल्याचे आढळून आले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी रविवारी पुण्यात संवाद साधला. शहरातल्या 105 ठिकाणी स्क्रिनद्वारे प्रक्षेपित केलेली ही मुलाखत लाखो पुणेकरांनी प्रत्यक्ष ऐकली. ‘सोशल मीडिया’च्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर देखील लाखो पुणेकर प्रत्यक्ष तसेच सोमवारी दिवसभर मुख्यमंत्र्यांना ऐकत होते. या संवादास विविध युट्यूब चॅनेल्सवर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्यूज झालेले दिसून आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराची पातळी सोडली असताना त्याला संयमित भाषेत चोख प्रत्युत्तर देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांची हवा काढून घेतली. पुणेकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवरील नेमक्या उपायोजनांची अभ्यासपूर्ण मांडणी फडणवीस यांनी केली. यामुळे, सुसंस्कृत पुण्याचे विचारी, विवेकी आणि संयमी नेतृत्व मुख्यमंत्री फडणवीसच करू शकतात, असा विश्वास पुणेकरांमध्ये निर्माण झाला.
“आमच्या लक्षात आले होते, की पुणे, पिंपरी-चिंचवडसारख्या काही शहरांमध्ये आम्ही युतीने लढू शकत नाही. पण जिथे आपण लढतो आहोत, तिथे एकमेकांवर, एकमेकांच्या पक्षांवर टीका करू नये, असे मी सांगितले होते. मी अजूनही संयम पाळला आहे; अजित पवार यांचा संयम मात्र ढळला आहे. कदाचित निवडणुकीतील परिस्थिती पाहून त्यांचा संयम कमी झालेला मला वाटतोय. पण पंधरा तारखेनंतर ते बोलणार नाहीत,”असा चिमटाही फडणवीस यांनी घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो प्रवास मोफत करण्याची घोषणा केली. हे खरेच शक्य आहे का, या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मी आज जाहीर करणार होतो, की पुण्यातून उडणारी जेवढी विमाने आहेत, त्याचे तिकीट महिलांसाठी माफ केले पाहिजे. आपल्या बापाचे काय जाते घोषणा करायला?” मुख्यमंत्र्यांच्या या टोल्यावर पुणेकरांमध्ये जोरदार हशा पिकला. त्यानंतर गंभीर होत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले, की किमान लोकांचा विश्वास बसेल अशा तरी घोषणा केल्या पाहिजेत. मेट्रो एकट्या राज्याची नाही. केंद्राची देखील आहे. ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत, ती आश्वासने कशाला द्यायची?
गुन्हेगारांची जागा जेलमध्येच
भाजपाच्या विरोधात काही पक्षांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याने पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले, की गुन्हेगार निवडून जरी आले तरी त्यांची जागा महापालिकेत नसून जेलमध्येच असेल. गुन्हेगारांचे कंबरडे मोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.