

पुणे : जामखेड तालुक्यातील एका गावामधील उसाच्या शेतात सचिन घायवळ लपून बसल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. परंतू पोलिस तेथे पोहचल्याची चाहूल लागताच त्याने शेतातून पळ काढल्याचे समोर आले आहे. एका महिलेने सचिनला पोलिस आल्याची माहिती दिल्याचा संशय आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडला आहे.
दरम्यान, सचिनला पळून जाण्यास मदत करणारी महिला देखील पोलिसांच्या रडावर आहे. तिला ताब्यात घेऊन पोलिस कसून चौकशी करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. तिला ताब्यात घेण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्याची माहिती आहेत.
सचिन घायवळ हा गुंड निलेश घायवळचा मोठा भाऊ आहे. ४४ लाख ३६ हजार रुपयांची खंडणी उकळल्याच्या आरोपावरून गुंड निलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन घायवळ यांच्यासह तेरा जणांवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कर्वेनगर, शिवणे भागातील एका नामवंत शाळेतील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ, तसेच वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एका खासगी कंपनीतील संचालक महिलेकडून ही खंडणी उकळण्यात आली होती.
याप्रकणी, एका खासगी कंपनीतील ४० वर्षीय संचालक महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, बापू कदम, नीलेश घायवळ, सचिन घायवळ, पप्पू दळवी, अभि गोरडे, दीपक आमले, बाबू वीर, अमोल बंडगर, बाबू पिसाळ, अमोल लाखे, संदीप फाटक, बबलू गोळेकर आणि बबलू सुरवसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढे पोलिसांनी सचिन घायवळ याच्यावर देखील महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. तेव्हापासून सचिन पुण्यातून फरार झाला आहे.
पोलिस त्याचा शोध घेत होते. गेल्या आठवड्यात सचिन जामखेड तालुक्यातील एका गावातील शेतातील उसात लपून बसला आहे. अशी माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथक त्याच्या मागावर जामखेड येथे धडकले. परंतू त्याच गावातील एका महिलेने सचिन याला पोलिस त्याला पकडण्याठी आल्याची माहिती दिली. त्यामुळे तो अलर्ट झाला. पोलिस त्याच्या जवळ पोहचलेच होते. परंतू त्या पुर्वीच त्याने तेथून पळ काढला. गुन्हे शाखेने आपला मोर्चा आता सचिन याला पोलिस आल्याची टिप देणाऱ्या महिलेकडे वळविला आहे. तिला ताब्यात घेऊन पोलिस तिची कसून चौकशी करणार असल्याची माहिती आहे.
तर दुसरीकडे गुंड निलेश घायवळ आद्याप देखील विदेशात फरार आहे. तो ब्रिटनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती आहे. कोथरुड गोळीबार प्रकरणात तो फरार असून, त्याच्यावर बनावट पासपोर्ट प्रकरणी देखील गुन्हा दाखल आहे. त्याच्या घरझडतीस काडतूसाचा बॉक्स आढळून आला होता. तर त्याच्या एका साथीदाराने देखील शस्त्र परवाना मिळविताना खोटी माहिती दिली होती. त्याने दोनशे काडतूसे शेतात फायर केली होती. पोलिसांनी त्याचा शस्त्र परवाना रद्द केला आहे. निलेश घायवळ याला न्यायालयाने फरारी घोषीत केले आहे. निलेशच्या मालमत्तेवर टाच आणण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात आली आहे. त्याच्या प्रत्यार्पनासाठी ब्रिटीश उच्चायुक्त कार्यालयाशी पुणे पोलिसांनी पत्रव्यावहार केला आहे.