पुणे : यंदा विचित्र हवामानाचा फटका देश-विदेशातून राज्यात येणार्या पक्ष्यांना बसला आहे. उत्तर भारतात दाट धुक्यामुळे पक्ष्यांची वाट धूसर बनली आहे, तर दक्षिण भारतात सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसामुळे त्यांची अन्नसाखळी विस्कळीत झाल्याने यंदा 40 टक्के पक्ष्यांचे स्थलांतर लांबले आहे, असा दावा पक्षीतज्ज्ञांनी केला आहे. देशात सर्वत्र 5 जानेवारी रोजी 'राष्ट्रीय पक्षी दिन' साजरा होतो. त्यानिमित्ताने पक्षी निरीक्षणाचे कार्यक्रम होतात; मात्र यंदा भारतात अल निनो ही हवामानाची परिस्थिती सक्रिय आहे. त्यामुळे हवामान लहरी बनले आहे. पावसाळ्यात पाऊस झाला नाही, तो आता पडत आहे. हिवाळ्यात थंडी कमी आहे. आकाश निरभ्र नाही. ते सतत ढगाळ असते.
उत्तर भारतात तर 200 ते 500 मीटर अंतरावरचे काही दिसत नाही, इतकी द़ृश्यमानता कमी झाली आहे. हवेच्या वरच्या थरातही हीच स्थिती असल्याने विदेशातून महाराष्ट्रात यंदाच्या हिवाळ्यात अजूनही पक्षी म्हणावे तेवढ्या संख्येने आलेले नाहीत. पक्षीतज्ज्ञांच्या मते 40 टक्के पक्ष्यांचे स्थलांतर विचित्र हवामानामुळे लांबले आहे.
भारतात सुमारे 159 जातींचे पक्षी स्थलांतर करतात. यात थापट्या नकटा, शेंडी बदक, लालसरी, मराल, तरंग, गडवाल, चक्रवाक या बदकांसह कदंब, पट्टकदंब हेसुद्धा येतात. तसेच चमचा, अवाक, तुतवार, शेकाट्या, कारंडव, उचाट, सोनचिलखा, कुरव असे पाणथळीचे पक्षी येतात. शिकारी पक्ष्यांत गप्पीदास, कस्तूर, शंकर, धोबी, क्रौंच, ससाणा, शिक्रा, कवड्या हरिण, तिसा, श्येन कुकरी, खरुची यांचा समावेश असतो. स्थलांतरित पक्ष्यांसाठीचे धोके अधिवासांच्या नाशामुळे वाढले आहेत. विशेषत: थांबा आणि हिवाळ्यातील ठिकाणे तसेच पॉवर लाईन्स आणि विंड फार्मसारख्या संरचना हे घटक जबाबदार आहेत.
महाराष्ट्रात प्रामुख्याने मध्य आशियातून सर्वाधिक पक्षी येतात. तसेच, सैबेरियातूनही येतात. गॉडविट, बदकांच्या अनेक जाती येतात. मध्य आशियातून चक्रवाक येतो, तर कच्छमधून फ्लेमिंगो येतो. यंदा विचित्र हवामानाचा फटका पक्ष्यांना बसला आहे. उत्तरेत दाट धुके असल्याने पक्षांना दिसणे कठीण होत आहे. दक्षिणेत अतिवृष्टी सुरू असल्याने अन्नसाखळीवरही परिणाम झाल्याने दरवर्षीच्या तुलनेत तब्बल 40 टक्के पक्ष्यांचे स्थलांतर लांबल्याचे दिसत आहे.
– डॉ. दिलीप यार्दी, पक्षीतज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर
हेही वाचा