

तेल अवीव/गाझा, वृत्तसंस्था : इस्रायल-हमास युद्धात हमासच्या दहशतवाद्यांनी आता गाझातील लहान मुलांनाही उतरविले आहे. रॉकेट लाँचरसह सर्व प्रकारची स्वयंचलित शस्त्रे चालविण्याचे प्रशिक्षण या मुलांना देण्यात आले आहे.
170 वर लहान मुले इस्रायली सैन्याविरुद्ध अनेक आघाड्यांवर तैनात असून यापैकी बहुतांशांची ओळख आम्ही पटविलेली आहे. पण मुले लहान असल्याने ती जाहीर करणे आम्हाला अमानवीय वाटते, असे इस्रायलच्या लष्कराने स्पष्ट केले आहे. इस्रायलने यापूर्वीही हमासवर अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत. मात्र पहिल्यांदाच पुरावा म्हणून व्हिडीओ आणि छायाचित्रेही सोशल मीडियावर जारी केली आहेत.
कोणीही जन्मत: दहशतवादी नसतो; पण हमाससारखे कट्टरवादी हमासचे दहशतवादी लहानपणापासूनच पुढच्या पिढ्या तशा घडविण्याचे पाप करतात आणि त्याला पूण्य म्हणवून घेतात, असे या छायाचित्रे व व्हिडीओंसह इस्रायलच्या लष्कराने नमूद केलेले आहे. मुलांना आघाड्यांवर तैनात करून हमासचे दहशतवादी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी बिळात दडून बसले आहेत, असेही यात म्हटलेले आहे.
बॉम्ब-हातबॉम्ब हाताळणे व टाकणेही मुलांना शिकविले जाते. स्फोटके हलविण्यासाठी तर हमखास मुलांचा वापर केला जातो.
शाळांतूनही द्वेषाचे धडे
गाझामधील शाळांमध्ये इस्रायल आणि ज्यूंबद्दल मुलांमध्ये द्वेष पेरला जातो. जगाला बघायचे असेल तर त्याचे शेकडो पुरावे आमच्याकडे आहेत. ज्यूंची (यहुदी) हत्या करणे, हे पवित्र कार्य आहे, असे या मुलांमध्ये रुजविले जात असेल तर मोठेपणी त्यांच्याकडून दुसर्या काय अपेक्षा करणार, असा सवालही इस्रायलने केला आहे.