बीजिंग; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या आर्थिक प्रगतीचे आणि सुधारलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधांचे चीनच्या 'ग्लोबल टाइम्स' या वृत्तपत्राने तोंड भरून कौतुक केले आहे. भारताच्या आर्थिक भरभराटीबरोबरच सामाजिक बदल, प्रशासकीय सुधारणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल एका विशेष लेखात प्रशंसोद्गार काढण्यात आले आहेत. चीनमधील प्रमुख प्रसारमाध्यम असलेल्या या वृत्तपत्रात अशी प्रशंसा प्रसिद्ध होणे अत्यंत दुर्मीळ मानले जाते.
शांघायच्या मुदान विद्यापीठातील दक्षिण आशियाई अभ्यास केंद्राचे संचालक झांग जियाडोंग यांनी हा लेख लिहिला आहे. यात गेल्या चार वर्षांतील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकला आहे. भारताचा बळकट आर्थिक विकास, शहरी प्रशासनातील सुधारणा आणि विशेषत: चीनसोबतच्या आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दलच्या द़ृष्टिकोनातील बदलाचे यात कौतुक करण्यात आले आहे. चीन आणि भारत यांच्यातील व्यापार असंतुलनावर चर्चेत, भारतीय प्रतिनिधी पूर्वी प्रामुख्याने व्यापार असमतोल कमी करण्यासाठी चीनच्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करायचे. आता ते भारताच्या निर्यात क्षमतेवर अधिक भर देत आहेत, असे लेखकाने म्हटले आहे.