

पुणे: महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत आम्ही माहिती अधिकारात माहिती मागितली. त्यात महिला वैद्यकीय अधिकार्यांनी गैरव्यवहार केला असल्याचे उघड झाल्यानेच त्यांनी माझ्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिल्याचे स्पष्टीकरण भाजपच्या माथाडी आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम यांनी दिले.
आरोग्य विभागातील कर्मचार्याने कदम जाणिवपूर्वक मानसिक त्रास देत असल्याबाबत राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यावर कदम यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केला. ते म्हणाले, महापालिकेच्या कमला नेहरु रुग्णालयात खासगी संस्थेमार्फत ज्या हृदयशस्त्रक्रिया चालतात, त्यामध्ये संबधित महिला अधिकारीने अंशदायी योजना आणि शहरी गरिब योजनेतंर्गत बोगस बिले काढली आहेत. एका वर्षांतील माहितीवरून हे स्पष्ट होत आहे. (Latest Pune News)
त्यासंदर्भात आम्ही सविस्तर माहिती मागविली होती. मात्र, ही माहिती देण्यास संबधित अधिकार्याकडून टाळाटाळ केली जात आहे. आरोग्य विभागात चालणारे घोटाळ्याचे रॅकेट तोडण्याचा प्रयत्न मी केला. मी रितसर मार्गाने आंदोलन केले, कोणालाही अपशब्द वापरले नाहीत. बदली होऊल या भितीमुळे मात्र, संबधित महिला अधिकार्यांनी माझ्या विरोधात खोटी तक्रार दिली आहे.
मी उघड केलेल्या भ्रष्ट्राचारात जर तथ्य नसेल तर मी कोणत्याही कारवाईला सामोरे जाईल. मात्र, जाणिवपुर्वक मला आणि पक्षाला यात बदनाम केले जात असून आहे. त्यामुळे या भ्रष्ट्राचाराची चौकशी करून संबधित सर्व अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कदम यांनी केली.
कदम, कांबळे यांना महापालिकेमध्ये प्रवेशबंदी
महिला अधिकार्याने केलेल्या तक्रारीची दखल घेत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांना महापालिकेत प्रवेशबंदीचे आदेश दिले आहेत. कर्मचार्यांवर मानसिक दबाव आणण्याचे प्रकार गंभीर असून त्यामुळे कठोर पावले उचलणे अनिवार्य असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.