

पुणे: पारंपरिक पद्धतीने ठरवलेले लग्न असो की प्रेमविवाह; लग्नाच्या बैठकीदरम्यान वराकडील मंडळी आम्हाला तुमच्याकडून काही नकोय. फक्त मुलगी आणि नारळच द्या, अशी मागणी करताना दिसतात. मात्र, बैठक संपल्यानंतर खर्या अर्थाने देवाणघेवाणीची चर्चा सुरू होते. ती म्हणजे लग्नखर्चापासून लग्नात येणार्या साहित्यांची.
यामध्ये वधुपिता सर्वकाही करायला तयार होतो. याला दोन कारणे दिसून येतात. पारंपरिक पद्धतीने लग्न जमवताना वरपक्ष हा त्यांच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या सक्षम असतो, तर प्रेमविवाहात मुलीच्या प्रेमाखातर वधुपिता सर्व गोष्टी करायला तयार होतो. (Latest Pune News)
याखेरीज मुलीच्या नावाने अप्रत्यक्षपणे तिला आनंदी ठेवण्यासाठी सासरच्यांकडून मागितलेल्या गिफ्टच्या रूपात हुंडा पुरविण्यापलीकडेही वधुपित्याला काही पर्याय नसतो, ही वस्तुस्थिती आहे. शिक्षण, आधुनिकता आणि कायद्याचा काही प्रमाणावरील धाक, यामुळे विवाहात प्रत्यक्ष हुंडा घेणे सामाजिक प्रतिष्ठेचे मानले जात नसले, तरी या हुंड्याचे स्वरूप अतिशय भयानक आणि गुंतागुंतीचे बनले आहे.
विवाहात व विवाहानंतर असे अनेक व्यवहार केले जात आहेत की, ज्यांना धर्म, संस्कृती, रीती यांचा मुलामा दिला जातो. लोकप्रिय संस्कृतीच्या प्रभावामुळे विवाह हे सांस्कृतिक उत्सव बनले आहे. ज्यामध्ये संगीत पार्टी, डिझायनर दागिने आणि कपडे, छायाचित्रीकरण, डेस्टिनेशन मॅरेज, भव्य लॉन्स इत्यादींचा समावेश लग्नामध्ये असणे तथाकथित सामाजिक प्रतिष्ठेचे बनले आहे.
या सर्वांची नैतिक जबाबदारी मुलीच्या पित्याला घ्यावी लागते. तसेच, शहरीकरणाच्या गतिशील प्रक्रियेमुळे व आकर्षणामुळे शहरात स्वत:चे घर असणे हे एक स्वप्न बनले आहे. या स्वप्नपूर्तीसाठी मुलीच्या वडिलांना हातभार लावावा लागतो. अशाप्रकारे आज हुंड्याचे स्वरूप बदलताना दिसते.
आर्थिक परिस्थिती सुधारताच लग्नकार्यात हुंड्याचे स्वरूपही बदलू लागले आहे. पैसे, दागिने, घरगुती साहित्य यापलीकडे आता ’डेस्टिनेशन वेडिंग’पासून व्यावसायिक वापरासाठीच्या जागा, अशी मागणी होताना दिसत आहे.
शिक्षणासोबतच आर्थिक स्तरही उंचावल्याने या अपेक्षा बदलल्याचे दिसत आहे. आजही सुशिक्षित समाजामधून प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष हुंड्याची मागणी होत आहे. आपली मुलगी मोठ्या घरात चालली आहे, हे दाखवून देण्यासाठी वधुपिताही वरपक्षाच्या हव्या त्या मागण्या मान्य करून लग्नसंस्कार पार पाडताना दिसून येतात.
प्रेमविवाहामध्ये अडवणुकीचीे प्रकरणे सर्वाधिक
गेल्या आठ ते दहा वर्षांमध्ये सुशिक्षित समाजामधून प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष हुंड्याच्या मागणीतून मानसिक त्रास होत असल्याने त्यासाठी समुपदेशनासाठी येणार्या महिलांचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा प्रेमविवाहामध्ये अडवणूक झालेली प्रकरणेही येतात.
प्रेमविवाह करण्याची प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा ठरवून केलेल्या लग्नाप्रमाणे मागण्या केल्या जातात आणि मग लग्न मोडायचे की नाही? असा प्रश्न मुलींसमोर निर्माण होतो. बहुतांश प्रकरणांत मुलीच्या आवडीसाठी पिता मागणीनुसार सर्व गोष्टी पुरवितात, असे कौटुंबिक न्यायालयातील वकील अॅड. गणेश माने यांनी नमूद केले.
अशिक्षितांपासून ते उच्च शिक्षितांपर्यंत सगळे सारखेच!
मुलगी उच्चशिक्षित नोकरदार असली, तरी लग्नाचा खर्च मुलीकडच्यांनीच करायचा, ही एक समाजधारणा बनली आहे. त्यामुळे मुलाकडचे यादी देतच राहतात आणि मुलीकडचे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी घर, जमीनही विकतात, ही वस्तुस्थिती आहे.
ही कथा अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांपर्यंत चालत आली आहे. काही ठिकाणी वर आणि वधुपक्ष निम्मानिम्मा खर्च करण्यास तयारही होतात. मात्र, हे प्रमाण खूप कमी आहे. ज्या कुटुंबामध्ये फक्त एकच मुलगी किंवा मुली आहेत, तिथे तर सगळे आमचेच शेवटी, ते जावयालाच मिळणार आहे, असा समजही बनलेला आहे.
मुलींना कसेतरी उजवणे हीच पालकांची भावना असते. मुलगी पंचविशीला आली, तरी अजूनही घरात कशी? असे प्रश्न विचारायला सुरुवात होते. तेव्हा मुलीकडची मंडळी समोरच्या मुलाकडच्या लोकांच्या सर्व मागण्या पुरवायला तयार होतात. भलेही त्यांची ऐपत असो अथवा नसो. त्यामुळे हुंडा पद्धत सुरू ठेवण्यास मुलींचे माता- पिताही जबाबदार असतात.
- विद्या क्षीरसागर, विवाह समुपदेशक