Pune Traffic: पुणेकरांनो लक्ष द्या! बकरी ईदनिमित्त गोळीबार मैदान चौक भागातील वाहतुकीत बदल
पुणे: बकरी ईदनिमित्त गोळीबार मैदान चौकातील ईदगाह मैदानावर आज (शनिवारी) सकाळी सहा वाजल्यापासून नमाजपठण होईपर्यंत मम्हादेवी चौक-गोळीबार मैदान चौक-ढोले पाटील चौक व सीडीओ चौक ते गोळीबार मैदान चौक यादरम्यानच्या वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.
असे असतील वाहतुकीतील बदल
भैरोबानाला ते गोळीबार मैदान चौकाकडे जाणारी वाहतूक भैरोबानाला येथे आवश्यकतेनुसार सकाळी सहा ते साडेअकरा वाजेपर्यंत बंद राहील. स्वारगेटकडे जाणारी जड वाहने (फक्त मार्केट यार्डसाठी) प्रिन्स ऑफ वेल्स रस्त्याने लुल्लानगर चौकामार्गे जातील, तर पुणे रेल्वे स्थानकाकडे जाणारी हलकी वाहने एम्प्रेस गार्डन रस्त्यामार्गे जातील.(Latest Pune News)
मम्हादेवी चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील. ही वाहने मम्हादेवी चौकातून बिशप शाळेमार्गे किंवा कमांड हॉस्पिटलमार्गे अथवा नेपियर रस्त्याने पुढे सीडीओ चौकातून जातील.
सीडीओ चौकातून गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक नमाजपठण काळात सकाळी सहा ते साडेअकरा वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. लुल्लानगरकडून येणारी वाहने सीडीओ चौकात डावीकडे वळतील, खटाव बंगला चौकातून उजवीकडे वळून नेपियर रस्त्याने मम्हादेवी चौकातून सरळ बिशप शाळेमार्गे जातील. (खटाव बंगला चौकातील उजवीकडील वळणावरील बंदी तात्पुरती उठविण्यात येईल.)
ढोले पाटील चौकाकडून गोळीबार मैदानाकडे येणारी वाहतूक बंद राहील. ही वाहने सॅलिसबरी पार्क-सीडीओ चौक-भैरोबानालामार्गे जातील.
जुनी सोलापूर बाजार चौकी ते गोळीबार चौक यादरम्यानची वाहतूक बंद राहील. खाणे मारुती चौकाकडून येणारी वाहने पुलगेट डेपो, सोलापूर बाजार चौकमार्गे सरळ नेपियर रस्त्याने, खटाव बंगलामार्गे किंवा मम्हादेवी चौकमार्गे जातील.
लुल्लानगर चौकातून गोळीबार मैदानाकडे येणार्या पीएमपी, एसटी, मालवाहतूक अशा जड वाहनांना बंदी असेल. त्यांना लुल्लानगर चौकातून भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौकातून पुढे जाता येईल

