

पुणे: वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएव्दारे घेण्यात येणारी नीट यूजी परीक्षा देशासह राज्यात आज तब्बल साडेपाच हजार परीक्षा केंद्रांवर दुपारी 2 ते 5 या एकाच सत्रात घेण्यात येणार आहे. संबंधित परीक्षेचे हॉलतिकीट 30 एप्रिलला प्रसिद्ध झाले आहे. यावर्षी तब्बल 23 लाख उमेदवार या परीक्षेला बसणार आहेत. प्रवेशपत्रासोबतच एनटीएने परीक्षेबाबत अनेक मार्गदर्शक तत्त्वे देखील जाहीर केली आहेत.
परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल. ही परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच सत्रात घेतली जाईल. या वेळी नीट यूजी परीक्षा देशातील 550 शहरांमधील सुमारे पाच हजार केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षेची वेळ दुपारी 2 ते 5 अशी असेल. 2025 च्या नीट यूजी परीक्षेत विद्यार्थ्यांकडून एकूण 180 बहुपर्यायी प्रकारचे प्रश्न विचारले जातील. (Latest Pune News)
विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी 3 तास म्हणजेच 180 मिनिटे दिली जातील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी विद्यार्थ्यांना 4 गुण दिले जातील. या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंगची पध्दत आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल. प्रश्नपत्रिका एकूण 720 गुणांची असेल.
पेपरमध्ये भौतिकशास्त्र विषयाचे 45, रसायनशास्त्र विषयाचे 25 आणि जीवशास्त्र (प्राणिशास्त्र-वनस्पतिशास्त्र) या विषयाचे 90 प्रश्न विचारले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली जाते. त्यामुळे परीक्षा केंद्रावर काय घेऊन जावे आणि काय घेऊन जाऊ नये, याची विद्यार्थ्यांनी माहिती घेऊनच परीक्षेला जाणे गरजेचे आहे.
हे परीक्षा केंद्रावर घेऊन जाऊ शकता...
तुम्ही एक पारदर्शक पाण्याची बाटली सोबत ठेवू शकता.
स्व-घोषणापत्र सोबत बाळगायला विसरू नका.
आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, 12वी बोर्डाची गुणपत्रिका, पासपोर्ट, रेशन कार्ड किंवा आधार नोंदणी स्लिप असे कोणतेही सरकार मान्यताप्राप्त फोटो ओळखपत्र सोबत ठेवा.
या कागदपत्रांच्या छायाप्रती/डिजिटल प्रती परीक्षा केंद्रावर वैध राहणार नाहीत.
परीक्षा पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी मूळ ओएमआर शीट आणि प्रवेशपत्र पर्यवेक्षकांकडे सादर करावे.
उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर एक दिवस आधी भेट द्यावी.
परीक्षा केंद्रावर हे न्यायला बंदी...
मोठी बटने असलेले कपडे आणि जाड तळवे असलेले बूट घालू नका.
नोट्स, कागदपत्रांचे तुकडे, जिओमेट्री बॉक्स, प्लास्टिक पाउच,
कॅल्क्युलेटर, स्टेशनरी आणि पेन ड्राइव्हसारखे कोणत्याही प्रकारचे
अभ्यास साहित्य सोबत बाळगू नका.
परीक्षा केंद्रांवर मोबाईल फोन, ब्लू टूथ डिव्हाइस, इअर फोन, मायक्रो फोन, पेजर, स्मार्टवॉच, हेल्थ बँडसारखी संप्रेषण साधने वापरण्यास बंदी आहे.
परीक्षा केंद्रावर पाकीट, सनग्लासेस, बेल्ट, कॅप्स, ब—ेसलेट, कॅमेरा, दागिने किंवा कोणत्याही प्रकारच्या धातूच्या वस्तू नेण्यास परवानगी नाही.
परीक्षा केंद्रात ब्लू टूथ गॅझेट्स, स्पाय कॅमेरे, मायक्रो चिप्स इत्यादी कोणत्याही वस्तू घेऊन जाऊ नका, ज्यामुळे कॉपी होण्यास मदत होऊ शकते.