बाणेर: बाणेर येथील सूस खिंड परिसरात (सर्व्हे नं. 48/2/1) महापालिकेने उभारलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाविरोधात नागरिकांनी रविवारी भरपावसात मानवी साखळी करून आंदोलन केले. ’प्रकल्प बंद करा, स्वच्छ हवा मिळू द्या,’ यासह विविध फलक हाती घेत नागरिकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला. हा प्रकल्प तातडीने स्थलांतरित करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
सूस रोड बाणेर विकास मंचच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. महापालिकेने 2016 मध्ये बाणेर येथील कीर्ती गार्डन टेकडीजवळ कचरा प्रकल्प उभारला होता. रस्त्याची जागा ताब्यात नसतानाही महापालिकेने हा प्रकल्प उभारला. या प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधीची समस्या निर्माण होत असल्याने नागरिकांनी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला होता. (Latest Pune News)
सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाप्रमाणे हा प्रकल्प चालविला जात नसल्याने तो स्थलांतरित करण्याची मागणी परिसरातील सोसायट्यांतील रहिवाशांसह नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकल्पाविरोधात नागरिकांनी मानवी साखळी करून आंदोलन केले. या वेळी नागरिकांनी महापालिका प्रशासनाचा निषेध केला.
या आंदोलनात बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. माजी नगरसेवक ज्ञानेश्वर तापकीर म्हणाले की, महापालिका बाणेर, सूस रोड येथील कचरा प्रकल्पासाठी गेल्या नऊ वर्षांपासून माझी जागा बेकायदाशीरपणे वापरत आहे.
या जागेचा वापर त्वरित थांबविण्यात यावा, यासाठी महापालिकेकडे वारंवार अर्ज करूनही दखल घेतली जात नाही. या प्रकल्पासाठी रस्ताही खासगी मालकीचा असून, तो बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
महापालिकाने खासगी जागेत अतिक्रमण केले आहे. सूस रोड बाणेर विकास मंचचे विनायक देशपांडे, हरिश पाटील, बाळासाहेब भांडे, गणेश तापकीर, अॅड. सत्या मुळे, पुष्कर कुलकर्णी, शैलेंद्र पटेल, सतीश पाषाणकर, दिलीप कळमकर, राशिनकर, मोहोळकर आदी या वेळी उपस्थित होते.
कचरा प्रकल्प आरक्षित जागेवरच
महापालिकेचे उपायुक्त संदीप कदम म्हणाले की, ज्ञानेश्वर तापकीर यांना जागा ताब्यात देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला असून, मालमत्ता व्यवस्थापन विभागाला देखील याबाबत कळविले आहे. या प्रकल्पाचा त्रास नागरिकांना होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. हा प्रकल्प महापालिकेने आरक्षित जागेवर उभारला आहे.
महापालिकेने कचरा प्रकल्पबाबत सर्वोच्च न्यायलयाच्या निर्देशाचे पालन न करता अवमान केला आहे. नागरिक हा प्रकल्प स्थलांतरित करण्याची मागणी करीत असताना प्रशासन मात्र दखल घेत नाही.
- विनय देशपांडे, अध्यक्ष, सूस रोड बाणेर विकास मंच