

पुणे: नणंदेसह तिचा मुलगा, मुलगी व सुनेकडून सतत कौटुंबिक कारणावरून होणार्या छळाला कंटाळून महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना धनकवडी परिसरात घडली. याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नणदेसह चौघांवर गुन्हा नोंदविला आहे.
वर्षा तुकाराम रणदिवे (व्यंकटेश अपार्टमेंटसमोर, गोविंदराव पाटीलनगर, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उज्ज्वला बागाव (वय 50), योगेश बागाव (वय 35), वैशाली बागाव (वय 32), सुवर्णा बागाव (वय 25) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तुकाराम रणदिवे (वय 43, रा. धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे. (Latest Pune News)
पोलिसांच्या माहितीनुसार, उज्ज्वला बागाव तक्रारदार तुकाराम रणदिवे यांची बहीण आहे. ते शेजारी शेजारी राहतात. उज्ज्वला, तिचा मुलगा योगेश, मुलगी वैशाली व सून सुवर्णा यांनी वर्षा रणदिवे यांना टोमणे मारून तिचा छळ केला. कौटुंबिक कारणावरून सतत त्यांचा छळ केला जात होता. या छळाला कंटाळून वर्षा यांनी गळफास घेऊन 24 मे रोजी आत्महत्या केली.
याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. वर्षा यांचे पती तुकाराम रणदिवे यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी केलेल्या तपासात वर्षा यांनी आरोपींनी केलेल्या छळामुळे आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक निरीक्षक पवार करीत आहेत.