

पुणे: सदाशिव पेठेत भावे हायस्कूलजवळच्या चहाच्या हॉटेलसमोर उभ्या असलेल्या बारा जणांना धडक देणार्या मद्यपी वाहनचालकाला न्यायालयाने रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे या वाहनचालकाचा मुक्काम आता येरवडा कारागृहात राहणार आहे.
आरोपी चालकाकडे वाहन परवाना नव्हता, त्याला चारचाकी चालवता येत नसताना मद्यपान केलेले असतानाही वाहन चालवल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जयराम शिवाजी मुळे (वय 27, रा. बिबवेवाडी; मूळ रा. मुळज, ता. उमरगा, जि. धाराशिव) असे न्यायालयीन कोठडी झालेल्या कारचालकाचे नाव आहे. (Latest Pune News)
अपघातावेळी चारचाकीत असलेला सहप्रवासी राहुल गोसावी (वय 27) आणि मोटारमालक दिगंबर शिंदे (वय 27) यांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत तसेच त्यांना तपासासाठी हजर राहण्याची नोटीस बजाविण्यात आली आहे, असे विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक विजयमाला पवार यांनी सांगितले. सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलसमोरून छत्रपती राजाराम मंडळाकडे जाणार्या गल्लीत चहाच्या दुकानासमोर चहा घेत थांबलेल्या बारा जणांना शनिवारी सायंकाळी भरधाव प्रवासी चारचाकीने उडविले.
या अपघातात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत; तर इतरांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. आरोपी मुळे याने मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना नव्हता, तसेच त्याला चारचाकी चालविता येत नाही.
तरीही त्याने चारचाकी चालविल्याने हा अपघात घडल्याची माहिती सरकार पक्षातर्फे न्यायालयात देण्यात आली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने मुळे याला न्यायालयीन कोठडी सुनावत त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली. उपनिरीक्षक गणेश फडतडे तपास करत आहेत.