वाघोली: दररोज होणारी वाहतूक कोंडी आणि गंभीर अपघातांची संख्या लक्षात घेता पुणे शहर वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांना शहरातील रस्त्यांवर ठरावीक वेळेतच परवानगी दिली. परंतु, या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत पुणे-नगर महामार्गावर अवजड वाहने धावत आहेत. वाहतूक पोलिसांनी या वाहनांवर कारवाई करावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
वाहतूक विभागाकडून काही महिन्यांपूर्वीच अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली तसेच सहा ते दहाचाकी वाहनांना रेड झोन वगळून रात्री 11 ते पहाटे 6 या वेळेतच वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. (Latest Pune News)
मात्र, वाहतूक विभागाने ठरवून दिलेली वेळ न पाळणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे आदी नियमांचे उल्लंघन करीत दररोज अवजड वाहने बिनधास्तपणे परिसरातील रस्त्यांवरून धावत आहेत.
पुणे-नगर महामार्गावर अनेकांना आपले जीव गमवावे लागले. महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असताना वाहतूक पोलिसांकडून कारवाई होत असली, तरी परिवहन विभाग कारवाईबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
डंपर, मिक्सर आदी अवजड वाहनांवर वाहतूक विभागाच्या वतीने वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. वेळेचे बंधन घालून दिलेले असताना देखील वाहनधारक बिनधास्त वेळेचे बंधन न पाळता धावत आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनांवर वेळीच कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- हिरामण वाघमारे, उपाध्यक्ष, पुणे शहर वंचित बहुजन आघाडी
वाढती वाहनांची संख्या व वाहतूक कोंडी लक्षात घेता वाघोली परिसरात नियमांचे उल्लंघन करून धावणार्या अवजड वाहनांवर लवकरच कठोर कारवाई करण्यात येईल. यापुढे नियमांचे उल्लंघन करणार्या जड वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच या कारवाईमध्ये सातत्य ठेवण्यात येईल.
- दत्तात्रय लिंगाडे, सहायक पोलिस निरीक्षक, वाघोली वाहतूक शाखा