

इंदापूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी- लोणी देवकर रस्त्यावरील कौठळी वन जमीन हद्दीत शनिवारी (दि. २२) अज्ञात वाहनाच्या धडकेत चिंकारा जातीचे हरिण जागीच ठार झाले. लोणी देवकर औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सतत वर्दळ असते. शनिवारी वाहनाने चिंकाराला जोरदार धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. चिंकारा रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत पडल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी तातडीने वन विभागाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, वन विभागाशी लवकर संपर्क होऊ शकला नाही. निमगावातील फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबला ही माहिती कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, चिंकाराचा मृत्यु झाला होता.
हे चिंकारा जातीची दीड वर्षाचे मादी हरीण होते. सकाळी रस्ता ओलांडताना वाहनाच्या धडकेने त्याच्या पोटाला व तोंडाला जबर मार लागल्याने ही घटना घडली, असे वन विभागाने सांगितले. मृत चिंकारास निमगाव केतकी येथील खासगी रुग्णवाहिकेतून इंदापूरला वनविभागाकडे शवाविच्छेदनासाठी नेण्यात आले.
इंदापूर तालुक्यात सर्वाधिक वनक्षेत्र आहे. तेथे विविध पशुपक्षी आहेत. जखमी प्राणी तसेच पक्षी यांच्यावरील उपचारासाठी तातडीने रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे. वन विभागाने रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्यावी. तसेच चिंकाराच्या मृत्यूस जबाबदार चालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबने केली आहे. वनीकरणात गस्त वाढवावी, रस्त्याच्या दुतर्फा चिंकारा प्रवण क्षेत्र असल्याचे फलक लावावेत, वनीकरणातुन जाणाऱ्या रस्त्यावर गतिरोधक बसवावे अशी मागणी फ्रेंड्स ऑफ नेचर क्लबचे वैभव जाधव, ॲड. सचिन राऊत,ॲड. श्रीकांत करे, आशिष हुंबरे, किरण लोणकर यांनी केली आहे.
हेही वाचा: