

तळेगाव दाभाडे : राजकीय विरोधाच्या खेळीत गेल्या सहा-सात वर्षांहून अधिक काळ वादविवादाच्या भोवर्यात अडकलेल्या सुमारे 37 कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेच्या विकासकामांची पाहणी मुख्याधिकारी एन. के. पाटील यांनी शुक्रवारी (दि. 22) केली.
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत राबविल्या जाणा-या या योजनेचे कार्यनियोजन सुरुवातीपासूनच नसल्यामुळे ती प्रलंबित होत आहे.
पाइपलाइनसाठी जागोजागी केलेल्या खोदाईमुळे रस्त्यांची दुरवस्था असून नागरिक हैराण झाले आहेत. यावर मुख्याधिकारी आता अॅक्शन मोडवर आले असून, त्यांनी विविध विकासकामांच्या प्रकल्पस्थळांना भेटी देऊन योजनांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकारी आणि ठेकेदारांना दिल्या.
भुयारी गटार योजनेसह नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा प्रकल्प, 55 कोटींचा नूतन जलशुद्धीकरण प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन केंद्र, इंद्रायणी आणि चौराई जलशुद्धीकरण केंद्र, शिव-शंभू स्मारक आदी प्रकल्पांच्या विकासकामांची त्यांनी पाहणी केली. नव्याने सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रांच्या पाणी अहवालाची छाननी करून पाणी गुणवत्ता सुधारणेसाठी कर्मचार्यांना सूचना केल्या. शिव-शंभू स्मारकाचे काम गतिमान आणि चांगल्या पद्धतीने करण्याची ताकिद कंत्राटदाराला दिली. नगर परिषदेच्या नूतन इमारतीच्या बांधकामास वेग देऊन गुणवत्तापूर्ण काम करण्याचे आदेश ठेकेदारांना त्यांनी दिले.
शहरातील घनकचरा व्यवस्थापन कर्मचा-यांनी स्वसंरक्षण साहित्याचा वापर करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहनही पाटील यांनी भेटीदरम्यान केले. घनकचरा ओला, सुका व घातक कचरा संकलित सर्व भागात घंटागाडीच्या फेर्यांमध्ये टाळाटाळ न करण्याची तसेच डासांच्या प्रादुर्भावाचा बंदोबस्तात कसूर न करण्याची तंबी मुख्याधिकार्यांनी ठेकेदारांना दिली.
हेही वाचा