सावधान ! शहरात भटकतात लम्पीग्रस्त जनावरे | पुढारी

सावधान ! शहरात भटकतात लम्पीग्रस्त जनावरे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात पिंपळे निलख भागामध्ये लम्पीग्रस्त जनावरे भटकत आहेत. यामध्ये एका वासरालादेखील लम्पीची लागण झाली आहे. त्यामुळे शहरात लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरात सप्टेंबर महिन्यात 27 जनावरांमध्ये लम्पी आजाराची लक्षणे आढळली होती. त्यानंतर त्याचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे आढळले. राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने महापालिकेच्या वतीने लम्पी आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे.

तसेच, या आजाराचा फैलाव होऊ नये, यासाठी आवश्यक दक्षता घेतली जात आहे. लम्पीचा संसर्ग रोखण्यासाठी जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करणे, शहरातील विविध भागात धुरीकरण करणे, आजाराची लक्षणे आढळून आलेल्या जनावरांवर तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात येत आहे. मात्र, लम्पी आजाराने ग्रस्त जनावरांची वेगळी व्यवस्था न केल्याने इतर जनावरांमध्ये ही जनावरे मोकाट फिरत आहेत. पर्यायाने इतर जनावरांनादेखील लम्पी आजाराची लागण होण्याची शक्यता आहे.

पिंपळे निलख येथे आढळलेल्या दोन ते तीन जनावरांवर उपचार करणे सुरू आहे. लवकरच त्यांची वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे.

– डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका.

हेही वाचा

Back to top button