मुख्यमंत्री शिंदेसह दोन उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारकडून जेवणाचे निमंत्रण

मुख्यमंत्री शिंदेसह दोन उपमुख्यमंत्र्यांना शरद पवारकडून जेवणाचे निमंत्रण

बारामती : पुढारी वृत्तसेवा : शनिवारी (दि. 2) बारामती दौर्‍यावर येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकार्‍यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 'गोविंदबाग' निवासस्थानी भोजनाचे निमंत्रण दिले आहे. शरद पवार यांची आणखी एक गुगली राज्यभरात चर्चेचा विषय बनली आहे. शरद पवार यांनी यासंबंधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात शरद पवार म्हणतात, शनिवारी आपण बारामती येथे शासकीय दौर्‍यानिमित्त येत असल्याचे समजले. या शासकीय कार्यक्रमप्रसंगी संसद सदस्य या नात्याने मला आणि सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. तसेच, यादिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो.

आपण मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरात प्रथमच येत आहात, याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील 'गोविंदबाग' या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. मेळाव्यानंतर मंत्रिमंडळातील सहकार्‍यांसह आपण या निमंत्रणाचा स्वीकार करावा, असे पवार यांनी पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत शरद पवार यांच्याकडून फडणवीस व अजित पवार यांनाही देण्यात आली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news