

भवानीनगर : बारा लाख टनापेक्षा जास्त ऊस गाळपासाठी दिल्यास श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना एक नंबरला आल्याशिवाय राहणार नाही, असे मत कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी व्यक्त केले.(Latest Pune News)
श्री छत्रपती कारखान्याचा 70 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ दसऱ्याच्या मुहूर्तावर गुरुवारी (दि. 2) सकाळी पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. युनिट क्रमांक एकचा समारंभ संचालिका माधुरी सागर राजपुरे व त्यांचे पती सागर दत्तात्रय राजपुरे यांच्या हस्ते तर युनिट क्रमांक दोनचा समारंभ संचालिका सुचिता सचिन सपकळ व त्यांचे पती सचिन अशोकराव सपकळ यांच्या हस्ते झाला. या वेळी माजी अध्यक्ष प्रशांत काटे, उपाध्यक्ष कैलास गावडे, संचालक ॲड. शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर,
शिवाजी निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, संतोष मासाळ, नीलेश टिळेकर, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, डॉ. योगेश पाटील, तानाजी शिंदे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, फायनान्स मॅनेजर हनुमंत करवर, कामगार नेते युवराज रणवरे, तानाजीराव थोरात, भागवत घुले, सतीश काटे, संभाजी काटे, संतोष चव्हाण आदींसह सभासद, कामगार या वेळी उपस्थित होते.
जाचक म्हणाले, कारखाना आर्थिक संकटात असल्यामुळे मागच्या उसाला पैसे देणे शक्य नाही. बारा लाख टनापेक्षा जास्त उसाचे गाळप झाले पाहिजे. सभासदांकडे थकबाकी असली तरी पहिल्या वर्षी एक रुपयादेखील कपात करणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची साथ नसती तर यंदा कारखाना चालू झाला नसता. सध्या साखरेचा दर चाळीस रुपये आहे, तो 60 रुपये झाला पाहिजे. लोकं पिझ्झा- बर्गर खाण्यासाठी एका वेळेला दोनशे रुपये घालवतात, साखर साठ रुपये झाली तर काही बिघडत नाही. प्रति टन साडेतीन हजार रुपयात ऊस व्यवसाय परवडत नाही.
साखरेचे उत्पादन जास्त होते, त्यावेळी साखरेची निर्यात होते. उत्पादन कमी होते त्यावेळी निर्यात होत नाही, असे साखरेचे गणित कडू आहे. कांदा - साखरेचे दर वाढले की लोकांच्या डोळ्यात पाणी येते. सोन्याचा दर वाढला तर झळाळी येते. चांगला साखर उतारा असणाऱ्या उसाच्या लागणी केल्या पाहिजेत. गेटकेन ऊस घेताना चांगला साखर उतारा मिळाला पाहिजे. खोडव्याला अनुदान देण्याचा संचालक मंडळाचा विचार आहे, असे जाचक यांनी सांगितले.
प्रशांत काटे म्हणाले, कारखान्याला गतवैभव प्राप्त होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करायला हवे. मागे 80 टक्के सभासदांनी गाळपासाठी ऊस दिला नाही. सभासदांची साथ मिळाली नाही तर पुन्हा तेच दिवस पुढे येतील.
थकबाकीचा प्रश्न सोडविणार
यावर्षी सभासदांकडील कोणत्याही प्रकारची थकबाकी वसूल केली जाणार नाही. तसेच ज्यांनी दहा रुपये घेतले होते त्याचे 40 रुपये झाले असतील तर दहा रुपयाला दहाच रुपये घेऊन सभासदांच्या थकबाकीचा प्रश्न मिटवण्यात येईल, असे या वेळी सांगण्यात आले.