

chatrapati sambhaji maharaj birth anniversary
सासवड : किल्ले पुरंदर (ता. पुरंदर) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शंभूभक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी मंगळवारी (दि. 13) रात्री 12 वाजेपासून शंभूभक्त ज्योत घेऊन येत होते. ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या घोषणांनी किल्ल्याचा संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. (Pune News Update)
बुधवारी (दि. 14) सकाळी 7 वाजता श्री पुरंदरेश्वरा महादेव मंदिरामध्ये दही, दूध पंचामृताने रुद्राभिषेक व शासकीय पूजा गटविकास अधिकारी पंकज शेळके, गटशिक्षणाधिकारी संतोष डुबल यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार आणि मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, तहसीलदार विक्रम रजपूत यांच्यासह हजारो शंभूभक्त उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थानी पारंपरिक वेशातील संजना गोसावी, स्वाती कटके, रूपाली गळंगे, प्रतिभा जगताप, अदिती लवांडे आदींसह उपस्थित महिलांनी छत्रपती संभाजीराजांची महती सांगणारे पाळणागीत म्हटले. त्यानंतर उपस्थितांना प्रसाद म्हणून सुंठवडा वाटप करण्यात आला. हजारो शंभूभक्तांनी संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळास भेट देऊन दर्शन घेतले. छत्रपती संभाजी महाराज सभागृहात जन्मस्थळावर फुलांची सजावट करण्यात आली होती, तसेच आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती.
सभागृहांमध्ये सर्व गडांवरील छायाचित्रे व त्यांची माहिती देखील शंभूभक्तांसाठी ठेवण्यात आली होती. किल्ले पुरंदर येथे येणार्या सर्व शंभूभक्तांस पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले होते.माँ जिजाऊमाता यांचे जन्मस्थान मातृतीर्थ सिंदखेड राजा ते किल्ले पुरंदर पवित्र जलकलश, माँ जिजाऊं पालखीचे सकाळी 7 वाजता आगमन झाले. या पायी वारीचे हे तिसरे वर्ष आहे. माँ जिजाऊ जन्मस्थान सिंदखेड राजा येथून शुक्रवारी (दि. 2) दुपारी 2 वाजता पायी वारीचे प्रस्थान झाले. सिंदखेड राजा ते किल्ले पुरंदर हा 365 किलोमीटर पायी प्रवास होता, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. रावसाहेब कोल्हे यांनी दिली.
या वेळी पुरंदर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत पाटणे, प्रकाश शिंदे, रणजित बाठे, योगेश देशमुख, रविराज शिंदे, नारायणपूरचे सरपंच प्रदीप बोरकर, ग्रामसेवक रोहित अभंग यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.