कडूस: चासकमान धरणक्षेत्र तसेच डोंगरमाथ्यावर कधी संततधार तर कधी तुरळक पावसामुळे चासकमान धरण आत्ताच 80.89 टक्के म्हणजेच एकूण 7.088 टीएमसी भरले आहे. तर उपयुक्त 6.12 टीएमसी पाणलोटक्षेत्रात पावसाची अजूनही दमदार बॅटिंग सुरूच आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून सोमवारी (दि. 7) सायंकाळी 6 वाजेपर्यंत चासकमान धरणातून एकूण 2200 क्युसेकने भीमा नदीत विसर्ग करण्यात आला.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात विशेषतः भीमाशंकर अभयारण्य परिसरात यंदा प्रथमच मे महिन्यापासून दमदार पावसाने सुरुवात केली. त्यामुळे 8.54 टीएमसी क्षमता असलेले चासकमान धरण 80 टक्के भरले आहे. त्यातच सध्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Latest Pune News)
त्यामुळे धरण्याचे तीनही दरवाजे प्रत्येकी 20 सेंटिमीटरने उचलून सांडव्याद्वारे 1800 क्युसेक वेगाने विसर्ग सोडण्यात आला. दरम्यान, पाणलोट पावसाचा जोर कायम राहिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी सकाळी 11 वाजता अतिवाहिनीद्वारे नियंत्रित पद्धतीने 400 क्युसेकने विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे सायंकाळी 6 पर्यंत चासकमान धरणातून एकूण 2200 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला.
चासकमान धरणाच्या पाणलोटक्षेत्रात अजूनही जोरदार पाऊस सुरू आहे. या भागात गेल्या 24 तासांत 23 मिलिमीटर तर एकूण 398 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पाणलोट क्षेत्रांतील ओढे-नाले दोन महिन्यांपासून दुथडी भरून वाहत आहेत. भीमा व आरळा नदीद्वारे धरणात सरासरी 4 हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे.
धरणाच्या साखळी परिसरात संततधार सुरूच आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याचा अंदाज घेऊन धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. तसेच धरणाचा पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी विसर्गात वाढही होऊ शकते. यामुळे भीमा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने इशारा देण्यात आला आहे.
मागील वर्षी याच तारखेला धरणात 11.86 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्या तुलनेत यंदा धरणात 70 टक्के जादा पाणीसाठा झाला आहे. धरण लवकरच पूर्णक्षमतेने भरणार असल्याने खेडसह शिरूर तालुक्याचा पाणी प्रश्न मिटला असून, शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
सध्या चासकमान धरणाची पाणीपातळी 647.15 दशलक्ष घनमीटर आहे, तर एकूण साठा 200.70 दशलक्ष घनमीटर आहे, तर उपयुक्त साठा 173.51 दशलक्ष घनमीटर आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणाची पाणीपातळी 633 दशलक्ष घनमीटर होती, तर एकूण साठा 52.65 दशलक्ष घनमीटर होता. उपयुक्त साठा 25.46 दशलक्ष घनमीटर होता.
धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ
चासकमान धरणाजवळील कळमोडी धरण 24 जून रोजीच शंभर टक्के भरले आहे. धरणाच्या पाणलोटक्षेत्रात एकूण 621 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. या धरणातील संपूर्ण पाणी आरळा नदीद्वारे चासकमान धरणात येत असल्याने चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.
धरणे भरली तरी फायदा नाही!
धरणे भरलेली असली तरी पश्चिम पट्ट्यातील शेतकर्यांना त्याचा फारसा लाभ मिळत नाही. कारण, धरणाच्या पाणलोट क्षेत्राखालील नद्यांवर पुरेशे बंधारे नाहीत. त्यामुळे धरणात पाणी असलं, तरी ते शेतांपर्यंत पोहोचत नाही. धरणाच्या कालव्यांद्वारे केवळ पूर्व भागातील खेड व शिरूर तालुक्यांमध्येच आवर्तन सोडले जाते, परिणामी पश्चिम भागातील नद्यांची पात्रं कोरडी पडत आहेत. शेतकर्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
भात पिकाचे नुकसान
कळमोडी व चासकमान धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मे महिन्यापासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली. या अतिपावसामुळे भातपिके झोडपली गेली. पाण्याच्या मार्याने रोपे मातीतच कुजली, तर काही भागांत भातरोपे तयार करताच आली नाहीत. रोपवाटिकांमधील रोपांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्याचा परिणाम म्हणून आता भात रोपांची किंमत झपाट्याने वाढणार आहे. या सर्व परिस्थितीचा थेट परिणाम भात उत्पादनावर होणार असून हंगाम अयशस्वी ठरण्याची शक्यता आहे.