नसरापूर: नसरापूर ग्रामपंचायतमध्ये धुडगूस घालून कर्मचार्यांना अश्लील शिवीगाळ करून दमदाटी देत सरकारी साहित्याची तोडफोड केली, याप्रकरणी राजगड पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत पोलिसांकडे कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मंगेश शिंदे (वय 45 रा. नायगाव, ता. भोर) असे नसरापूर येथील ग्रामपंचायतीत तोडफोड करणार्या आरोपीचे नाव आहे. तो येथील रहिवाशी नसल्याचे आता समोर आले आहे. ही घटना सोमवारी (दि.7) दुपारी सव्वाबारा वाजताच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. (Latest Pune News)
याप्रकरणी माजी उपसरपंच संदीप कदम, उपसरपंच नामदेव चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी विजयकुमार कुलकर्णी, ग्रामपंचायत कर्मचारी रुपेश ओव्हाळ यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
मंगेश शिंदे याने ग्रामपंचायतमध्ये प्रवेश करून नियमित काम करणार्या दोन महिला सेविका व एक कर्मचारी यांना जोरजोरात आरडाओरड केली. त्याने ओरडून सरपंच, ग्रामसेवक कुठे आहेत. यानंतर शिंदे याने अचानक ग्रामसेवक यांच्या टेबलवरील साहित्याची तोडफोड केली. रुपेश ओव्हाळ याने त्याला हाकलून लावले. दरम्यान, यापूर्वी देखील मंगेश शिंदेने ग्रामपंचायतमध्ये येऊन दमदाटी, अरेरावी केली होती. पुढील तपास राजगड पोलिस करत आहेत.
मंगेशची पत्रकार म्हणून तोतयागिरी
घटना घडल्यानंतर मंगेश शिंदे यांनी स्वतःच्या मोबाईलवरून तक्रारदारालाच फोन करून मी पत्रकार जाधव बोलतोय. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये घडलेल्या प्रकाराबाबत मला फिर्याद पाठवा, अशी पत्रकार म्हणून बतावणी केल्याचेही उघड झाले आहे.
आता गैरकृत्य करणार्याची गय नाही, ग्रामपंचायतीत घडलेली घटना निंदनीय आहे. त्यामुळे प्रत्यक्षदर्शनी कर्मचार्यांच्या मार्फत संबंधित व्यक्तीवर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. तसेच आगामी काळात ग्रामपंचायत कार्यालय आणि गावात गैरकृत्य करणार्यांची गय केली जाणार नाही.
- उषा कदम, सरपंच, नसरापूर