

पुणे: पाण्याची मोटार दुरुस्त करत असताना विजेचा धक्का लागल्याने बिगारी कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना तालीम चौक घोरपडी परिसरात घडली. याप्रकरणी ठेकेदारासह घरमालकाविरुद्ध निष्काळजीपणा आणि हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Pune News)
किरण उघडे (वय 32, रा. भिमनगर, मुंढवा) असे मृत्यू झालेल्या बिगारी कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी रसूल शेख (वय 35, रा. भिमनगर, मुंढवा) आणि कुणाल रंगदळ (वय 45, रा. घोरपडी गाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत किरण याची पत्नी (वय 23) यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, किरण उघडे हे रसूल शेख या ठेकेदाराकडे बिगारीची कामे करत होता. त्याला इलेक्ट्रिकच्या कामाबद्दल काहीही माहिती नव्हती. याची माहिती असूनही ठेकेदार शेख याने 17 मे रोजी किरणला कुणाल रंगदळ याच्या घरी काहीतरी काम असल्याचे सांगून त्याला पाठविले. रंगदळ याच्या घरी पाण्याच्या मोटारीच्या दुरुस्तीचे काम होते. मोटारीच्या दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने किरण याचा मृत्यू झाला.
किरण उघडे याला इलेक्ट्रिकची कामे जमत नसल्याचे ठेकेदार शेख याला माहिती होते. असे असूनही शेख याने किरणला ते काम करण्यासाठी रंगदळ याच्या घरी पाठविले. तसेच, घरमालक रंगदळ याने देखील किरण याला इलेक्ट्रिकची कामे जमतात अथवा नाही याची कोणतीही शहानिशा केली नाही. तसेच कोणतीही खबरदारी न घेता मेन स्विच बंद न करता किरण याला मोटार दुरुस्त करायला लावली.
त्यामुळे मोटार दुरुस्त करत असताना विजेचा धक्का बसून किरणचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी ठेकेदार आणि घरमालकाविरुद्ध निष्काळजीपणा आणि हयगयीचे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक मांजरे तपास करत आहेत.