

Cost of delivery in hospitals
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे: शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये नॉर्मल आणि सिझेरियन प्रसूतीसाठी होणारा खर्च झपाट्याने वाढत आहे. हा खर्च सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांच्या आवाक्याबाहेर जात असल्यामुळे अनेक पालक आर्थिकद़ृष्ट्या अडचणीत येत आहेत. कमी वजनाचे किंवा मुदतपूर्व बाळ जन्माला आल्यास उपचारांसाठी लाखोंचा खर्च होतो, हे वास्तव आणखी गंभीर आहे. शासनाने या वाढत्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेला दाखल करून घेण्यासाठी 10 लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले होते. नवजात शिशू अतिदक्षता विभागासाठी येणारा खर्च लक्षात घेता ही रक्कम सांगण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांमधील प्रसूतींच्या वाढत्या खर्चाचा दै. ‘पुढारी’कडून आढावा घेण्यात आला. त्या वेळी रुग्णालयांमधील वाढत्या ‘कॉर्पोरेट कल्चर’मुळे खर्चात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. (Latest Pune News)
पुण्यातील खासगी रुग्णालयांमध्ये नॉर्मल प्रसूतीसाठी सरासरी 40 हजार ते 80 हजार रुपयांपर्यंत, तर सिझेरियन प्रसूतीसाठी 80 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. याशिवाय, नवजात बाळाला काही वैद्यकीय गुंतागुंतीमुळे ‘निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट’ (एनआयसीयू)मध्ये ठेवावे लागल्यास खर्चाची रक्कम तीन ते सहा लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.
प्रसूती ही अत्यावश्यक सेवा असली, तरी तिचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर चालला आहे. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, अद्ययावत उपकरणे, स्पेशालिस्ट डॉक्टरांची फी यांमुळे प्रसूतीचा खर्च वाढत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये सिझेरियन प्रसूतींची संख्या वाढत असून, काही वेळा वैद्यकीय कारणांमुळे तर काही वेळा आर्थिक गणितांमुळे ती केली जाते, अशीही चर्चा आहे.
सरकारी रुग्णालयातील सेवांबाबत साशंकता
शहरातील कमला नेहरू रुग्णालय, ससून सर्वोपचार रुग्णालय, औंध जिल्हा रुग्णालय अशा शासकीय रुग्णालयांमधील आरोग्य सेवेच्या दर्जाबाबत अजूनही सामान्यांच्या मनात शंका असतात. त्यामुळे प्रसूतीसारख्या महत्त्वाच्या टप्प्यावर आर्थिक भार स्वीकारून खासगी रुग्णालयांकडे जास्त कल असतो. प्रत्यक्षात शहरातील शासकीय रुग्णालयांमधील नवजात शिशू अतिदक्षता विभागांमध्ये अद्ययावत आणि दर्जेदार आरोग्यसेवा मोफत दिली जात आहे.
खर्च वाढण्यामागची कारणे
खासगी रुग्णालयांचे कॉर्पोरेटीकरण
अत्याधुनिक सुविधांचा खर्च
सरकारी रुग्णालयांबाबत साशंकता
औषधे आणि उपकरणांचे वाढते दर
वाढती विमाकवच रक्कम
आज प्रसूतीचा खर्च लाखोंच्या घरात जात आहे. आरोग्य विमा असूनही कर्ज काढावे लागते, तर काही वेळा सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही. बर्याचदा विम्यामध्ये प्रसूतीचा खर्च कव्हर होत नाही, असा आमचा अनुभव आहे.
- राहुल ढमाले
पालक खाटांची संख्या, उपलब्ध सुविधा, कुशल डॉक्टर, अद्ययावत तंत्रज्ञान अशा विविध निकषांवर विविध रुग्णालयांमधील प्रसूतीचा खर्च अवलंबून असतो. कोणतेही रुग्णालय रुग्णाकडून विनाकारण अवास्तव शुल्क आकारत नाही. मातेची आणि गर्भातील बाळाची प्रकृती, गुंतागुंत अशा विविध मुद्द्यांचा विचार करून नॉर्मल प्रसूती करायची की सिझेरियन, याचा निर्णय घेतला जातो.
- डॉ. वैशाली मेहता, वरिष्ठ प्रसूतिरोगतज्ज्ञ