

सासवड : पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुणे, दिवेघाट, सासवड, जेजुरी, निरा, लोणंदमार्गे पंढरपूरकडे जातो. तर संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणे ते सोलापूर मार्गाने रोटी घाटमार्गे बारामती, इंदापूर, अकलूज मार्गे पंढरपूरला जाते. या दोन्ही पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी पालखी सोहळा दि. 22 व 23 जून रोजी सासवड (ता. पुरंदर) येथे दोन दिवस मुक्कामी येणार आहे. यानिमित्त वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून, प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
पालखी 24 जूनला जेजुरी, 25 जूनला वाल्हे व 26 जूनला सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. या पार्श्वभूमीवर दिवे घाट परिसर 25 व 26 जून रोजी इतर वाहनांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती सासवड पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली.
22 जून पहाटे 2 वाजेपासून ते 24 जून 12 वाजेपर्यंत पुणे ते सासवडकडे येणारी दिवे घाट, बोपदेव घाट मार्गे वाहतूक बंद. पर्यायी मार्ग : खडीमशीन चौक-कात्रज-कापूरहोळ. सासवड बाजूकडून येणारी सर्व वाहतूक गराडे-खेड शिवापूर मार्गे पुण्याकडे येईल.
25 जून पहाटे 2 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पुणे-सासवड-जेजुरी-वाल्हे मार्ग बंद. पर्यायी मार्ग : झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव-निरा.
26 जून पहाटे 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत, वाल्हे-लोणंद मार्ग बंद. पर्यायी मार्ग : पुणे येथून सासवड-जेजुरी- वाल्हे- निराकडे तसेच निरा येथून पुण्याकडे जाणार्या वाहनांनी सासवड-जेजुरी-मोरगाव या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
पालखी काळात झेंडेवाडी ते निरादरम्यान चोख सुरक्षा ठेवण्यात आली असून, 6 डीवायएसपी, 18 पोलिस निरीक्षक, 85 एपीआय, 600 पोलिस, 100 वाहतूक पोलिस, 400 होमगार्ड, एसआरपीएफ पथक, वॉकीटॉकी व घातपात विरोधी पथक, वाहने अशी यंत्रणा सज्ज असणार आहे. पालखीचे सातारा जिल्ह्यात सुरळीत आगमन सुनिश्चित करण्यासाठी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक बारामती गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे मार्गदर्शन करणार आहेत.