कोंढवा : वटपौर्णिमेच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, सातजन्मी हाच पती मिळावा, अशी मनोकामना महिला वटवृक्षाची पूजा करून या दिवशी करतात. परंतु, या सणाच्या दिवशीच मंगळवारी (दि. 10) रात्री बारा वाजता महंमदवाडीत महिलांना पाण्यासाठी आक्रोश करावा लागला. वटवृक्षाखाली आंदोलन करीत रणरागिणींनी पालिका प्रशासनाचा निषेध केला. पाण्याची समस्या सोडवली नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी या वेळी दिला.
महंमदवाडी गावातील खालची आळी, मधली आळी येथे गेल्या तीन महिन्यांपासून कमी दाबाने तसेच दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे महिला आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत महिलांनी लष्कर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांकडे तक्रार करूनही त्यांना आश्वासनांव्यतिरिक्त काही मिळाले नाही. शेवटी संयम सुटल्याने मंगळवारी रात्री वटवृक्षाखाली एकत्र येत या रणरागिणींनी महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवत आक्रोश व्यक्त केला. ताई घुले, ज्योती घुले, मनीषा घुले, सारिका घुले, ताराबाई घुले, योगिता घुले, सिंधू घुले, नंदा घुले, जया राणे, ठाकूबाई थोरात, प्रभावती घुले यांच्यासह शेकडो महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका परिसरातील महिलांना सहन करावा लागत आहे. कमी दाबाने आणि दूषित पाणीपुरवठा होत असल्याने थंडी, ताप, उलट्या, जुलाब आदी आजरांमुळे परिसरातील लहान मुलांसह नागरिक हैराण झाले आहेत. सोसायट्यांमध्ये मुबलक पाणी दिले जाते. मात्र, इतर भागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या महिलांनी केला आहे.
महंमदवाडीत ज्या भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे, त्या भागातील ड्रेनेजलाइनचे चेंबर भरलेले आहेत. त्यांची साफसफाई करण्याबाबत ड्रेनेज विभागाला पत्र दिले आहे. लवकरच हे काम पूर्ण करून परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.
प्रवीण कळमकर, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका