रामलल्लांच्या प्रथम दर्शनाने चंद्रकांत पाटील भावुक..

रामलल्लांच्या प्रथम दर्शनाने चंद्रकांत पाटील भावुक..
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्री रामाच्या आगमनाने संपूर्ण देशात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभू श्री रामनामाने देशभरातील नागरिक जल्लोष करत असताना प्रभू श्री रामाच्या प्रथम दर्शनाने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील भावुक झाल्याचे पाहावयास मिळाले. श्री रामाच्या दर्शनाने जीवन सार्थक झाल्याचे भावनिक उद्गार त्यांनी काढले.
अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत प्रभू श्री रामाची प्रतिष्ठापना झाली.

यानिमित्त कोथरूडमधील मृत्युंजयेश्वर मंदिरात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मृत्युंजयेश्वराचे दर्शन घेऊन प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम दृकश्राव्य माध्यमातून पाहिला. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकारीवर्ग अनिल व्यास (छत्रपती संभाजीनगर संघचालक), देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत, कोथरूड मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, भाजपचे सर्व पदाधिकारी आणि भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी प्रभू श्री रामाच्या प्रतिष्ठापनेनंतर रामलल्लांचे दर्शन सर्वांसाठी खुले करण्यात आले. ते पाहताना मंत्री पाटील अतिशय भावुक झाले.

या कार्यक्रमानंतर बोलताना ते म्हणाले की, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून काम करत असताना स्वर्गीय मदनदास देवीजींचे मार्गदर्शन आणि मोरोपंतजी पिंगळे यांच्या सूचनेनुसार रामजन्मभूमीच्या आंदोलनाशी जोडलो गेलो. यावेळी माझ्यासह बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी आणि हरेंद्रकुमार पांडे यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे रामजन्मभूमीशी माझे भावनिक नाते निर्माण झाले आहे. श्री राम मंदिर निर्माण आणि प्रभू श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त प्रदीर्घ अमावस्येनंतर अनेक दशकांपासून पसरलेल्या गडद अंधकाराचा अंत करणारी पौर्णिमा सुरू झाली आहे. जगभरातील कोटी कोटी हिंदूंचे स्वप्न साकार झाले आहे. आजचा मंगल दिन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रामभक्त, कारसेवक यांचे त्याग, समर्पण आणि बलिदानाचे फलित आहे.
या कार्यक्रमानंतर मंदिरातील काही श्रमिक बांधव आणि कर्तव्यतत्पर महिला पोलिस अधिकारी तथा दामिनी पथकाचे कोथरूड पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news