तडका : सेवाभाव संपला अन्..! | पुढारी

तडका : सेवाभाव संपला अन्..!

नुकतीच शासनाने सोळा वर्षांखालील मुलांना कोचिंग क्लासला जाण्यास बंदी घातली आहे. खरेतर कोचिंग क्लासेस म्हणजे आधुनिक ज्ञानपीठेच आहेत. कोचिंग क्लासेस का सुरू झाले, याचा विचार करू या.

सुरुवातीला म्हणजे 80 च्या दशकात ट्युशन घेणारी मंडळी सेवाभावी वृत्तीची होती. विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य त्यांनी इमाने इतबारे केले. पुढे पुढे याही क्षेत्रामध्ये गर्दी झाली आणि ट्युशनचे कोचिंग क्लासेस झाले. कोचिंगमधील सेवाभाव संपला आणि मेवा आणि भाव यांची सांगड घालण्यात येऊ लागली. सुरुवातीला गणित आणि इंग्रजी या विषयांच्या शिकवण्यांना सुगीचे दिवस आले. विशिष्ट वेळात अशा शिकवणी घेणार्‍यांच्या घरासमोर सायकलींच्या रांगा दिसण्यास सुरुवात झाली. पुढे काळ बदलत गेला, तशा स्कुटीच्या रांगा दिसायला सुरुवात झाली; पण तोपर्यंत शिकवण्याचे कोचिंग क्लास झाले नव्हते. शाळेतील शिक्षणाला पूरक आणि शाळेत न घेतले जाणारे काही उपक्रम अशा शिकवण्यांमध्ये घेतले जात असत.

कुणाचे कोचिंग क्लास चालतील, याचा भरोसा तेव्हाही नसे आणि आजसुद्धा नाही. खूप हुशार आणि बुद्धिमान शिक्षक, प्राध्यापकांचे क्लासेस आडवे झालेले पाहण्यात आले आहेत. दरम्यान, शाळांमधील गुरुजनांनी आपल्या विद्यार्थ्यांनी कोचिंग क्लासकडे वळू नये, यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यास सुरुवात केली. ट्युशनला जाणार्‍या विद्यार्थ्यांचा भर वर्गात अपमान करणे हे त्यातील एक प्रमुख अस्त्र असे. यामुळेच विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी सुपर द्रोणाचार्य यांचा नाद सोडला नाही आणि त्याच वेळी पुढे फोफावणार्‍या कोचिंग क्लासेसचे बीजारोपण झाले.

संबंधित बातम्या

द्रोणाचार्यांनी अर्जुनाला पोपटाचा डोळा फोडण्याचे शिक्षण दिले होते. आधुनिक द्रोणाचार्यांनी न दिसणार्‍या पोपटाचासुद्धा डोळा फोडण्याचे प्रशिक्षण दिले. डोळा फोडून लोण्याचा गोळा अलगद शिष्याच्या खिशात टाकणारे द्रोणाचार्य महानच म्हणावे लागतील. पालक मंडळी कोचिंग क्लासेसवर खूश होती, कारण त्यामुळे शाळा, कॉलेज आणि क्लासला जाणे या प्रकारात वेळ जाऊ लागला. शाळा चालू असताना मैदाने ओस का पडतात, याचे कारण तुमच्या लक्षात आले असेलच.

काही चाणाक्ष शिकवणीकारांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत करण्यासाठी झटपट प्रकार काढले, त्याचे नाव क्रॅश कोर्स. सुट्ट्यांमध्ये संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून असे क्रॅश करून जर उद्या संसारासाठी निघाले, तर लग्नानंतरची दोन-तीन वर्षे गेली की लोक वानप्रस्थाश्रमात जायला मोकळे होतील. परगावी असणार्‍या कोचिंग क्लासेसनी प्रकाशनाचा व्यवसाय सुरू केला. नोट्स, गाईड, स्पेशल नोट्स या माध्यमातून पालकांचा खिसा हलका करण्याचे कार्य सतत सुरू असते. बाप सायकलवर फिरत असेल, तरी मुलगी महाविद्यालयात किंवा कोचिंग क्लासला जाताना स्कुटीवरून जाणे अनिवार्य होऊ लागले आहे. पुढील काळात एक तरी मूल आपल्याला झेपेल का, हा विचार करण्याची परिस्थिती पालकांवर आली, तर त्याची काही जबाबदारी कोचिंग क्लासेसवर आहे. आता सोळा वर्षांच्या खाली कोचिंग क्लासेसला बंदीचे काय काय परिणाम होतात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Back to top button