भाजपचा सहवास म्हणजे राजकीय विजनवास | पुढारी

भाजपचा सहवास म्हणजे राजकीय विजनवास

दै.‘पुढारी’च्या ‘सत्तेचा सारिपाट’ या पानावर ‘जो पवारांवरी विसंबला, त्याचा कार्यभार बुडला’ या शीर्षकाखाली राजकीय विश्लेषण प्रसिद्ध झाले आहे. त्यावर प्रतिवाद.

भाजपचा इतिहास चाळला, तर पक्षातील नेत्यांना सतत अपमानास्पद वागणूक आणि सोबत येणार्‍यांना कायमचा राजकीय विजनवास दिल्याचे दिसून येईल. केवळ सत्तालोभापोटी कोणत्याही स्तराला जाण्याची नीती हाच भाजपचा सत्तेचा सारिपाट राहिला आहे. त्यामुळे आजच्या आणि उद्याच्या राजकीय नेत्यांनी विशेषतः ज्यांच्याकडे उद्धव ठाकरे यांच्यासारखे स्वकर्तृत्व आणि वडिलोपार्जित कार्यकर्त्यांचे पाठबळ असेल, त्यांना भाजपपासून जपा हाच कार्यपाठ गिरवावा लागेल. कारण जो भाजपच्या नादी लागला, त्याला राजकीय विजनवास नक्की लाभला, हेच इतिहासात दिसून आले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी लोकसभेत सांगितले होते, ‘किसीके पार्टी को तोड मरोडकर अगर हमें सत्ता मिलती होगी, तो ऐसी सत्ता को मैं चिमटी से भी छूने कि इच्छा नहीं करूंगा,’ आताच्या भाजपचे धोरण अन्य पक्षांतील नेते फोडा आणि त्यांना आपल्या पक्षात घ्या, ते बर्‍या बोलाने येत नसतील, तर त्यांना ईडी, सीबीआय, एसआयटीच्या फासात अडकवा आणि भाजपमध्ये येण्यास भाग पाडा, एकतर भाजपमध्ये या नाहीतर तुरुंगात जा, असे आहे. भाजप आणि सहयोगी पक्षांचा युतीचा इतिहास बघता, शिवसेना आणि अकाली दल वगळता अन्य सर्व पक्ष भाजपची केंद्रातील सत्ता गेल्यावर भाजपला सोडून गेले.

शिवसेना भाजपसोबत सत्ता नसतानाही राज्यात केंद्रात सोबत होती. याउलट भाजपप्रणीत ‘एनडीए’तून 2002 ते 2014 या 12 वर्षांच्या काळात काही मतभेदांमुळे 14 पक्ष बाहेर पडले. जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स (2002), समता पार्टी (2003 ), द्रमुक (2004), हरियाणा विकास पार्टी (2004 ), इंडियन फेडरल डेमॉक्रॅटिक पार्टी (2004), तृणमूल काँग्रेस (2007), जनता दल सेक्युलर (2007), इंडियन लोकदल (2009), बिजू जनता दल (2009), तेलंगणा राष्ट्र समिती (2009 ), कामतापूर प्रोग्रेसिव्ह पार्टी – बंगाल (2010), उत्तराखंड क्रांती दल (2012), राष्ट्रीय लोकदल (2012), झारखंड मुक्ती मोर्चा (2012 ) अशी त्यांची नावे. मात्र, 2014 च्या नंतर हरियाणा जनहित काँग्रेस (2014), एमडीएमके (2014), रिव्होल्यूशनरी सोशलिस्ट पार्टी केरळ (2016), स्वाभिमानी पक्ष (2017 ), जम्मू काश्मीर पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी (2018), राष्ट्रीय लोक समता पार्टी (2018), तेलगू देसम (2018), गोरखा जनमुक्ती मोर्चा बंगाल (2019), प्रवासी निवासी पार्टी केरळ (2019), शिवसेना (2019), शिरोमणी अकाली दल (2020), राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष राजस्थान (2020), बोडोलँड पीपल्स फ्रंट (2021), डीएमडीके (2021), गोवा फॉरवर्ड पार्टी (2021), महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (2021), लोक इन्साफ पार्टी (2022) अशा 17 पक्षांनी अवघ्या आठ वर्षांत भाजपची साथ सोडते झाले.

‘एनडीए’त आजघडीला 17 पक्ष असले, तरी त्यापैकी किती पक्षांना भाजप किंमत देतो, हा संशोधनाचा विषय आहे. इतकेच नव्हे तर भाजपमध्ये असलेल्या भाजपच्या नेत्यांना तरी आज कुठे महत्त्व आहे? ना बोलण्याचे स्वातंत्र्य ना विचार करण्याचे. नुसते हो ला हो करणारेच आज पुढे आहेत. वाजपेयी-अडवाणी आणि प्रमोद महाजन- गोपीनाथ मुंडे यांच्या काळात असे होते का?

उद्धव ठाकरे यांची कार्यपद्धती

उद्धव ठाकरे यांनी अधिकृतपणे पक्षातील कामकाजात सहभाग घेण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यावेळच्या नेत्यांनी ते वडिलांप्रमाणे ते वागत नसून किंवा त्यांच्या स्टाईलचे अनुसरण करत नसल्याची टीका केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी नेहमीच सांगितलं, की माझ्या वडिलांनी मला कोणाचेही अनुकरण करू नको, अगदी माझेही, असे शिकवले आहे. मी माझ्या पद्धतीने सामान्यांसाठी चांगली कामे करावीत, इतकीच त्यांची अपेक्षा आहे. मी माझ्या वडिलांच्या विचारांचे अनुकरण करतो. जेव्हा उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख झाले, तेव्हा त्यांनी वेगळ्या पद्धतीने काम केले. त्यांनी त्यांचे लक्ष्य ठरवले आणि ते साध्यही केले.

पक्षांतर्गत वादासारख्या अनेक लढाया त्यांनी एकट्याने लढल्या. तीन दशकांपासून तळागाळापर्यंत जाऊन काम केल्याने उद्धव ठाकरे यांना यश मिळाले आहे. उद्धव ठाकरे 2019 नोव्हेंबरच्या आधी कधीही सरकार किंवा विधिमंडळाचा भाग नसल्याने त्यांच्या प्रशासकीय कौशल्यांवर टीका करणार्‍यांचे विचारही बदलले आहेत. उद्धव ठाकरे यांनी कधीही सहकार्‍यांचा घात केला नाही, उलट त्यांना सन्मानाने वागवले. अगदी बाळासाहेबांची सावली म्हणून ते वावरले; पण कधीही आपल्या सीमा ओलांडल्या नाहीत. भाजपसोबत कितीही मतभेद झाले, तरी योग्य वेळी जनतेच्या भल्यासाठी त्यांनी दोन पावले मागे घेतली. मात्र, भाजपने जेव्हा त्यांनाच संपवण्याचा घाट घातला, तेव्हा मात्र त्यांना पसरणी घाट दाखवून नमोहरम करण्यातही ते मागे हटले नाहीत. प्रामाणिकता, वचनबद्धता तसेच शांत आणि रचनात्मक आचरणामुळे त्यांचे कौतुक झाले. बाळासाहेब असेपर्यंत गोड वागणारे भाजपचे नेते बाळासाहेब कैलासवासी झाल्यावर मात्र एकदम पलटले. शिवसेना संपवा आणि महाराष्ट्र काबीज करा, या हेतूने झपाटले आणि त्यातूनच पुढील कारवाया झाल्या.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेशी युती केली. मात्र, ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती तोडली. त्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी एकट्याच्या जीवावर 63 आमदार निवडून आणले, तेव्हा भाजपला जाणवले की उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत आणि महाराष्ट्रात जनता उद्धव ठाकरे यांनाच महत्त्व देत आहे. कदाचित तेव्हाच हा उद्धव ठाकरे यांचे महत्त्व कमी करण्याचा डाव आखला गेला आणि सारिपाटावर सोंगट्या पसरल्या गेल्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला निवडणुकीनंतर सत्तेत समसमान वाटा देण्याचे आश्वासन दिले गेले आणि नंतर त्याला सोयीस्कर वाटाण्याच्या अक्षता लावल्या
गेल्या.

( शब्दांकन : अ‍ॅड. हर्षल प्रधान, शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते)

Back to top button