

पुणे: रविवारी 7 सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. विज्ञानाच्या भाषेत ते रविवारी रात्री 9.30 ते 1.20 पर्यंत असणार आहे. मात्र, भारतीय पंचांगानुसार त्याचे वेध पाळण्याचे संकेत दुपारी 3.30 पासून आहेत. गत शंभर वर्षांत याआधी 1978 आणि 1997 मध्ये ग्रहण आले होते. 1975 मध्ये ग्रहण असूनही मिरवणूक लांबली होती.
मात्र, 1997 मध्ये ग्रहणाचा विचार करीत ती 25 तासांत आटोपण्यात आली होती. त्यामुळे यंदा पंचांगानुसार विचार करून शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक किती तासांत संपणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. (Latest Pune News)
सप्टेंबरमध्ये अन् गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान गत शंभर वर्षांत दोनवेळा चंद्रग्रहण आलेले आहे. यंदा तिसरे चंद्रग्रहण येत आहे. मात्र, ते विसर्जनाच्या दुसर्या दिवशी आहे. पुणे शहरातील मिरवणूक दुसर्या दिवसापर्यंत चालते. विसर्जन मिरवणूक शनिवारी सकाळी 9 ते 10 दरम्यान सुरू होणार आहे. त्यामुळे रविवारी ती किती वाजता संपते, याची उत्सुकता आहे. कारण, प्रत्यक्ष ग्रहण रविवारी रात्री 9 नंतर असले, तरी भारतीय पंचांगानुसार वेध दुपारी 3.30 पासून पाळण्यास सांगितले आहे.
1978 मध्ये चंद्रग्रहण असूनही मिरवणूक लांबली
1978 साली 15 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशीच चंद्रग्रहण होते. त्यामुळे मिरवणूक लवकर संपावावी असे आवाहन होते. परंतु तसे मात्र झाले नाही. मिरवणूक शुक्रवारी 12 वाजता सुरू झाली ती शनिवारी सकाळी 9.30 वाजता संपली. गुरुवारी पहाटेपासून सदाशिव पेठेत शिवाजी मंदिरापर्यंत, बाजीराव रस्त्यावर टेलिफोन भवनपर्यंत, शिवाजी रस्त्यावर राष्ट्रभूषण चौकापर्यंत मंडळांनी मालमोटारी, टेम्पो आणून ठेवले होते परंतु त्यात गणपती मात्र नव्हते. सकाळी दहा वाजेपर्यंत ते आणण्यात आले.
1997 मध्ये लवकर मिरवणूक संपवली...
1997 मध्ये चंद्रग्रहण आल्याने विसर्जन ग्रहणापूर्वी व्हावे असा विविध पातळीवर प्रयत्न केला गेला. त्याचे फलित म्हणून मिरवणूक काहीशी लवकर म्हणजे 25 तासांनी संपली. कसबा गणपती पहिला येणार ही परंपरा जशी निर्माण झाली, तशी या मंडळाने शिस्तबद्ध मिरवणूक व वेळेत विसर्जन ही गोष्ट प्रत्येक वर्षी करून एक परंपरा व इतर मंडळांपुढे आदर्शच निर्माण केला. 1997 हे साल स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवाचे वर्ष असल्याने त्याचे प्रतिबिंब गणेशोत्सव व अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीतही पडले होते.