

सासवड : लक्ष्मीपूजन व दिवाळी पाडव्यानिमित्त फुलांना मोठी मागणी असते. याच संधीत पुरंदर तालुक्यातील चांबळी येथील प्रगतशील शेतकरी शहाजी बळवंत कामठे व त्यांचे कुटुंब शेवंतीच्या फुलशेतीतून चांगले उत्पन्न मिळवत आहेत. केवळ 12 गुंठ्यातून त्यांना तब्बल 1 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या फुलांचे बाजारभाव प्रतिकिलो 80 ते 120 रुपये आहे. (Latest Pune News)
गुलटेकडी (पुणे) आणि मुंबई येथील फुल मार्केटमध्ये शेवंतीची मोठी मागणी आहे. लक्ष्मीपूजन व दिवाळी पाडव्याच्या सणामुळे फुलांचे भाव दुपटीने वाढले आहेत. पुरंदर तालुक्यात शेवंतीसह ॲस्टर, गुलाब आणि सोनचाफाची शेती केली जाते. पावसाळ्यातील खरीप हंगामात रोपांची लागवड केल्यानंतर अडीच महिन्यांनी फुलांची काढणी सुरू होते.
शहाजी कामठे यांना त्यांच्या पत्नी चैत्राली कामठे आणि मुलगा श्रेयश कामठे यांची साथ लाभते. काढणी झालेली फुले जुड्या बांधून पुणे व मुंबईच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवली जातात, तर सासवडमध्येही स्थानिक फुलविक्री सुरू असते.
’लक्ष्मीपूजन व दिवाळी पाडव्याला शेवंतीची मागणी अधिक असते. या वेळी भाव दुपटीने वाढले आहेत,’ असे शहाजी यांनी सांगितले. याप्रसंगी अनिल कोदळे, अरुणा कोदळे, गीता चव्हाण, सविता चव्हाण, जिगीशा घारे आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यातील चांबळी, बोपगाव, शिवरी व पोंढे येथील शेतकरी फुलशेतीकडे वळत आहेत. पुण्याजवळील फुलमार्केटमुळे चांगला दर मिळत असून, प्रामुख्याने शेवंती, ॲस्टर, गुलाब व सोनचाफा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे, असे कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी सांगितले.
चांबळी येथे शेवंतीची काढणी करताना शहाजी कामठे व इतर.