पुण्यातील गणेशोत्सवावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर

पुण्यातील गणेशोत्सवावर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवात राज्य, तसेच देशाच्या वेगवेगळ्या भागांतून भाविक येतात. उत्सवी गर्दीवर शहरातील 1800 सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवणार आहेत. पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. उत्सवाच्या काळातील अनुचित घटना, दागिने व मोबाइल चोरीच्या घटना रोखणे तसेच संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. उत्सवाच्या काळात शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

स्थानिक पोलिस ठाण्यातील कर्मचारी, गुन्हे शाखेची पथके, महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेले दामिनी पथक, साध्या वेशातील पोलिस कर्मचार्‍यांचे पथक शहराच्या वेगवेगळ्या भागात गस्त घालणार आहेत. पुणे पोलिसांनी बसवलेले एक हजार 300 कॅमेरे, स्मार्ट सिटी योजना, महापालिकेच्या 500 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर उत्सवी गर्दीवर राहणार आहे.

शहरात अडीच हजारहून जास्त नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला आहे. मंडळांनी उत्सवाच्या कालावधीत मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मंडपाच्या परिसरातील रस्त्यांवरही कॅमेरे बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिवाजी रस्ता परिसरातील बुधवार चौक ते मंडईतील गोटीराम भैय्या चौक दरम्यान उत्सवाच्या कालावधीत भाविकांची मोठी गर्दी असते. मंडई, हुतात्मा बाबू गेनू चौक परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना भागात होणारी गर्दी विचारात घेऊन पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून गर्दीचे नियंत्रण करणे शक्य होईल. बंदोबस्तावरील पोलिस कर्मचार्‍यांना याबाबतच्या सूचना देण्यात येतील. सदाशिव पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ भागातील अंतर्गत भागातील दुकानदार, व्यावसायिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

गणेशोत्सवात लाखो भाविक पुणे शहरात येतात. भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, उत्सवातील गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर राहणार आहे. सार्वजनिक मंडळे, स्थानिक व्यापारी व व्यावसायिक यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news