कोल्हापुरात सकल मराठा समाजाचे बेमुदत उपोषण; गांधी जयंतीपासून सुरू | पुढारी

कोल्हापुरात सकल मराठा समाजाचे बेमुदत उपोषण; गांधी जयंतीपासून सुरू

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य मागासवर्ग आयोगाच्या कलम 11 ची अंमलबजावणी करावी, ओबीसी आरक्षणासंदर्भातील राज्य शासनाचे 1994 आणि 1995 चे शासन आदेश रद्द करावेत, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागण्यांसाठी गांधी जयंती (दि. 2, ऑक्टोबर) पासून कोल्हापुरात बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. एका महिलेसह दिलीप देसाई, अ‍ॅड. बाबा इंदुलकर उपोषणास बसणार आहेत. यासंदर्भात बुधवारी (दि. 13) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री कक्षास निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. इंदुलकर यांनी दिली.

अ‍ॅड. इंदुलकर म्हणाले, आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा आणि मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध करण्यास सरकारसह मागास आयोगाला अपयश आले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. रिव्ह्यू पिटिशन टिकले नाही, तर क्युरेटिव्ह पिटिशनचे गाजर दाखविले जात आहे. त्यामुळे मराठा समाजाने आंदोलनाची भूमिका घेतली आहे. कोल्हापुरातही आंदोलन करण्यात येत असून, आता मराठ्यांना आरक्षण द्या म्हणण्यापेक्षा उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य मागासवर्ग आयोगाच्या कलम 11 ची अंमलबजावणी करावी. राज्य शासनाचे ओबीसी आरक्षणासंदर्भातील 1994 आणि 1995 चे शासन आदेश रद्द करावेत, या मागण्यांवर भर दिला जाणार आहे. या मागण्यांसाठीच कोल्हापुरात शिवाजी चौकात बेमुदत उपोषण करणार आहे.

अ‍ॅड. इंदुलकर म्हणाले, मराठा समाज कुठल्याही समाजाचे आरक्षण हिसकावून घेऊ इच्छित नाही. परंतु, कायद्याने मिळणार्‍या आरक्षणापासून कोणी वंचित ठेवणार असेल, तर संघर्ष करण्यास मराठा समाज तयार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत शासनास मुदत देत आहोत. सकल मराठा समाजाने मांडलेल्या आठ मागण्यांसंदर्भात निर्णय न झाल्यास 2 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण केले जाणार आहे. बेमुदत उपोषणापूर्वी कोल्हापुरात जनजागृती करून क्रांती मोर्चा काढणे, लाक्षणिक उपोषण आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारणे, असे आंदोलन करण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेस दिलीप देसाई, बाबा पार्टे, किशोर घाटगे, अनिल घाटगे, अमरसिंह निंबाळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button