पोर्शे अपघात प्रकरणाची सीबीआय चौकशी करा : विजय वडेट्टीवार

पोर्शे अपघात प्रकरणाची सीबीआय चौकशी करा : विजय वडेट्टीवार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पोर्शे कार अपघात प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत आहे, त्या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गुन्ह्याची वेळेत नोंद होत नाही, रक्ताचे नमुने बदलले जात आहेत. सगळा तपास संशयास्पदरीत्या सुरू असून, अपघातग्रस्तांना न्याय मिळावा, यासाठी आता या प्रकणाची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी व्यक्त केले.

वडेट्टीवार बुधवारी पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी ते म्हणाले, आमचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी शहरात सुरू असलेल्या कारभाराची वस्तुस्थिती लोकांसमोर मांडली. गुन्हेगाराला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. आरोपी हा आरोपीच आहे. तो श्रीमंत आहे, म्हणून जो कोणी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. वडेट्टीवार म्हणाले, प्रकरण मिटवण्यासाठी राजकीय दबाव होता, त्याचे पुरावे आहेत. एवढी मोठी घटना घडते आणि पोलिस सुस्त होते.

गुन्ह्याची नोंद नीट होत नाही. रक्ताचे नमुने बदलले जातात. सगळं प्रकरण संशय निर्माण करणारे आहे. या प्रकरणामागे राजकीय पाठबळ आहे. गुन्हेगारांवर कोणत्याही परिस्थितीत कारवाई झाली पाहिजे. जो या प्रकरणात अडकला असेल, त्यात डॉक्टर, पोलिस कोणीही असो, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. पल्लवी सापळे यांना तपास करायला नव्हे तर साफसफाई करायला पाठवले आहे. तावरेला राजकीय संरक्षण मिळाले होते, त्यामुळे बदलीची वेळ आली असतानाही ससूनचे तावरे याची बदली झाली नाही. तसेच, गुन्हेगाराला बिर्याणी खायला घातली जाते, हे चुकीचे आहे, त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाई होणे, अपेक्षित आहे. गृहमंत्र्यांना याबाबत मागणी करणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news