शशांक तांबे
पिंपरी : कोरोनामधील टाळेबंदी आणि आई-वडील दोघेही कामात व्यस्त असल्याने लहान मुलांमध्ये मोबाईल, टीव्ही पाहण्याचे प्रमाण वाढले होते. या मुलांमध्ये अटेंशन डेफिसिट हाइपरॅक्टिव्हिटी डिसऑर्डरचे (अतिचंचलता) प्रमाण वाढत आहे. कोरोना टाळेबंदीमध्ये लहान मुले घरातच होती. अनेक सोसायट्यांनी खेळाची जागा बंद केली होती. त्यामुळे मुलांना घरात खेळावे लागत होते.
याचा परिणाम म्हणून मुलांचा वेळ टीव्हीवरील कार्टून, यु ट्युबवरील व्हिडिओ, मोबाईलवरील गेम खेळण्यात गेला. त्यामुळे मुलांचे डोळे खराब झालेच; परंतु लहान मुलांमधील चंचलतेवर याचा परिणाम झाला. आई-वडील दोघेही काम करत असल्याने अनेकदा लहान मुलांना जास्त लक्ष देता येत नाही. त्यामुळे लहान मुले 'अटेंशन सिकर' बनतात.
मुलांची चंचलता नियंत्रणात न राहिल्याने मुलांना कुठे कसे वागावे हे कळत नाही. मोबाईल काढून घेतला अथवा टीव्ही बंद केला की लहान मुलांना लगेच राग येतो. एखादी गोष्ट सांगितली की लगेच विसरून जातात.
गेल्या काही वर्षात विविध प्रकारचे कार्टून टीव्ही, युट्यूबवर येत आहेत. लहान मुलांना ते आवडत असल्याने मुलांना आपण पण तसेच आहोत असे वाटते. त्यामुळे लहान मुलांच्या खेळण्यात कार्टूनचे अनुकरण केले जाते. कार्टूनमधील सर्व खरे आहे असे समजून मुले त्याचे अनुकरण करतात. एखाद्या कार्टून प्रमाणे आवाज काढणे, त्यातील डायलॉग बोलणे, अभ्यास करत असताना कार्टूनचा
विचार करणे.
लहान मुले ही मुळात जास्त चंचल असतात तसेच त्यांना अनेक प्रश्न पडत असतात. परंतु अती प्रमाणात चंचल असणे चांगले नसते. त्यामुळे लहान मुलांना विविध गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणे गरजेचे आहे.
गेल्या काही वर्षात लहान मुलांचा मैदानी खेळांचा कल खूप कमी झाला आहे. त्यामुळे टीव्ही, मोबाईलचा वापर खूप वाढला आहे. जास्त करून जेवताना लहान मुले मोबाईल जास्त बघतात. त्यामुळे मुलांचा चंचलपणा कमी-जास्त होतो.
लहान मुलांमध्ये 'अटेंशन सिकर ' होण्याचे प्रमाण वाढत आहे. याचा अर्थ पालक वेळ देत नाहीत असा होत नाही तर ते रोज काय बघतात आणि काय ऐकतात यावर अवलंबून असते. लहान मुले नक्की कशाचे अनुकरण करत आहेत. यावर अटेंशन डेफिसिट हाइपरॅक्टिव्हिटी डिसऑर्डरचे प्रमाण अवलंबून असते. लहान वयात यावर योग्य मार्गदर्शन केले की लहान मुले यातून बाहेर येतात.
– हेमंत चोपडे , बाल मानसोपचार तज्ज्ञ