Shailaja Darade : शैलजा दराडेवर 30 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा

file photo
file photo

दौंड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नोकरीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल असलेल्या राज्य शिक्षण परिषदेची निलंबित आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे हिच्याविरुद्ध दौंड पोलिस ठाण्यात अशाच प्रकारचा फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. शैलजासह तिचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे व वीरधवल दादासाहेब दराडे (सर्व रा. अकोले, ता. इंदापूर) यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. नोकरीच्या आमिषाने सुनील ज्ञानदेव शिंदे (रा. पंचवटी अपार्टमेंट, रेल्वे हायस्कूलजवळ, दौंड) या युवकाची तीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार सुनील शिंदे यांनी दौंड पोलिसांत दिली होती.

याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील शिंदे यांची शेती इंदापूर तालुक्यातील अकोले येथे असल्याने तेथे त्यांचे नेहमीच जाणे-येणे असते व दराडेदेखील याच गावातील रहिवासी असल्याने त्यांची ओळख होती. दादासाहेब दराडे याने मला शिक्षक म्हणून नोकरी लावतो, माझी बहीण शैलजा रामचंद्र दराडे ही शिक्षण विभागात उपायुक्तपदावर आहे, असे सांगितले.

परंतु, याकरिता तुला 25 ते 30 लाख खर्च करण्याची तयारी ठेवावी लागेल. तुझे शिक्षण चांगले झाले आहे. तू अनुसूचित जाती-जमातीतील असून, माझी बहीण तुला चांगल्या मोठ्या हुद्द्यावर कामाला लावेल, असे आमिष दाखविले व म्हणाले की, तू मोठ्या हुद्द्यावर कामाला लागला तर तुझे कुटुंब सुखी होईल. खर्च तुला फक्त एकदाच करायचा आहे, असेही सांगितले, असे शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सुनील शिंदे याने विश्वास ठेवून सुरुवातीला त्यांना 4 लाख 95 हजार रुपयांचा चेक व पाच हजार रुपये रोख, नंतर पुन्हा 4 लाख 95 हजार रुपयांचा चेक, असे एकूण दहा लाख रुपये दिले. सदरची रक्कम दिल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे नियुक्तिपत्र मागितले. त्यांनी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक नियुक्तिपत्र दाखवले. परंतु, ते त्यांनी शिंदे यांना दिले नाही व त्यांनी शिंदे यांना पुढील रक्कम वीस लाखांकरिता तगादा लावला. तेव्हा शिंदे यांनी मित्र नवनाथ चव्हाण याला वरील प्रकार सांगितला.

चव्हाण यांनी मदत करण्यासाठी दोन दिवसांनी म्हणजेच 27/8/22 रोजी वीरधवल दराडे याच्या गुगल पेवर 97199 एवढी रक्कम पाठवली. त्यानंतर वीरधवल दराडे यांना फोन करून विचारले असता सध्या मी व माझी बहीण कामात आहे, असे त्याने सांगितले व राहिलेल्या रकमेचीसुद्धा आपण तजवीज करून ठेवा, असे सांगितले. यावरून त्यांनी पुन्हा वीरधवल दराडे याच्या गुगलवर 49,000 हजार रुपये 6/9/2022 रोजी जमा केले व 17/9/2022 रोजी पुन्हा 98 हजार रुपये पाठविले.

वीरधवल दराडे याच्याजवळ नियुक्तिपत्रासंदर्भात विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला, तुम्ही काही काळजी करू नका. शैलजा दराडे यांनी खूप लोकांना आतापर्यंत कामाला लावले आहे. तुमचेदेखील काम होईल, असे सांगितल्यावर शिंदे याने पुन्हा राहिलेले चार लाख रुपये वीरधवल दराडे यांच्या खात्यावर आरटीजीएस केले. शेवटची पाच लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन शिंदे गेले व माझे नियुक्तिपत्र द्या, असे ठणकावून सांगितले. त्या वेळी त्यांनी उत्तर दिले नाही.

22 फेब—ुवारी 2023 ला एका वृत्तवाहिनीवर दादासाहेब रामचंद्र दराडे, शैलजा रामचंद्र दराडे यांनी 41 विद्यार्थ्यांना नोकरीचे आमिष दाखवून प्रत्येकी 15 लाख रुपये फसवणूक केल्याची बातमी शिंदे यांनी पाहिली तेव्हा फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या तिघांविरोधात दौंड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश आबनावे करीत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news