

Laxman Hake FIR news
बारामती: बारामतीत 5 सप्टेंबर रोजी ओबीसी समाजाचा मोर्चा व मेळावा पार पडला. या मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली असताना तो काढला गेल्याने बारामती शहर पोलिस ठाण्यात ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल ओबीसी समाजाने नाराजी व्यक्त केली. आम्ही स्वतःहून सोमवारी (दि. 15) बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर होणार असून प्रशासनाने आम्हाला अटक करून दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे. (Latest Pune News)
सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने यांनी फिर्याद दिली. त्यानुसार चंद्रकांत वाघमोडे (रा. माळेगाव, ता. बारामती), अमोल सातकर (रा. जळोची, बारामती), पांडूरंग मेरगळ (रा. रावणगाव, ता. दौंड), बापूराव सोलनकर (रा. ढेकळवाडी, ता. बारामती), गोविंद देवकाते, नवनाथ पडळकर, किशोर मासाळ (तिघे रा. बारामती), किशोर हिंगणे (रा. पाटस रोड, बारामती), विठ्ठल देवकाते (रा. निरावागज, ता. बारामती), काळूराम चौधरी (रा. आमराई, बारामती), बापू कौले (रा. सुपा, ता. बाारामती), मंगेश ससाणे (रा. हडपसर), लक्ष्मण हाके (रा. सांगोला), जी. बी. गावडे (रा. मळद, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
धमक्या दिल्याचा ओबीसींचा आरोप
या संबंधी नवनाथ पडळकर, चंद्रकांत वाघमोडे, बापूसाहेब सोलनकर, जी. बी. गावडे, गोविंद देवकाते, विठ्ठल देवकाते, किशोर हिंगणे, काळूराम चौधरी, अमोल सातकर, असिफ खान आदींनी पत्रकार परिषद घेतली. गुन्हा दाखल झालेले कार्यकर्ते व आयोजक सोमवारी बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर होतील असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
हा गुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून दाखल झाला असल्याचा आरोप काळूराम चौधरी यांनी केला. मनोज जरांगे यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली होती. त्यांच्यावर कारवाईची आमची मागणी होती. परंतु, पोलिसांनी सहकार्य न करता आम्हाला धमक्या दिल्याचा आरोप ओबीसी समाजाने केला.