पुणे: पुण्यातील वैभवी गणेशोत्सव पार पडून सहा दिवस होऊनही अनेक मंडळांनी देखावे व मंडप काढले नाहीत. यामुळे शहरात वाहतूक कोंडी होत आहे. मंडळांनी तातडीने मंडप आणि मिरवणूक रथ रस्त्यातून बाजूला करावेत, असे आवाहन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केले होते. मात्र, त्यांच्या आवाहनाकडे देखील मंडळांनी दुर्लक्ष केले आहे.
पुण्यातील पारंपरिक गणेशोत्सव नुकताच पार पडला. यंदा 11 दिवस असलेल्ल्या गणेशोत्सवाची सांगता 7 सप्टेंबरला संध्याकाळी तब्बल 34 तास 45 मिनिटे लांबलेल्या विसर्जन मिरवणुकीने झाली. दरम्यान, गणेशोत्सवासाठी शहरातील विविध रस्त्यांवर उभारलेले बहुतांश मंडप सहा दिवस होऊनही अद्यापही जागेवरच आहेत. (Latest Pune News)
मंडपांनी जवळपास अर्धा रस्ता व्यापल्याने प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. अशातच विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या देखावे आणि साउंड सिस्टिम उभारलेल्या ट्रॉलीज देखील रस्त्यांवर तशाच उभ्या आहेत. काही भागात तर मुख्य रस्त्यांच्या कडेलाच या ट्रॉलीज देखाव्यांच्या स्ट्रक्चरसह उभ्या असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. यामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक मंदावून वाहतूक कोंडी होत आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी गणेश मंडळांनी तातडीने मंडप आणि ट्रॉलीज रस्त्यांवरून काढून घ्याव्यात आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत करावी. ज्या मंडळांनी मंडपांसाठी खड्डे खोदले असतील त्यांनी देखील खड्डे बुजवून सहकार्य करावे, असे आवाहन केले होते. मात्र, त्यांच्या आवाहनाला देखील मंडळांनी बगल दिली आहे. त्यामुळे अशा मंडळांवर महानगर पालिका कारवाई करणार का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे.