

पुणे: पुणे - सातारा रस्त्यावर चव्हाणनगर कमान पद्मावती भागात मोटारचालकाला मारहाण करून त्याच्याकडील 25 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या चोरट्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली.
तसेच त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. अनिकेत गणेश शिंदे (वय 19, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर, पर्वती) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
6 सप्टेंबर रोजी मोटारचालक पुणे-सातारा रस्त्यावरील चव्हाणनगर भागातून निघाला होता. चव्हाणनगर कमानीजवळ दुचाकीवरून आरोपी अनिकेत शिंदे आणि अल्पवयीन साथीदार आले. दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणातून त्यांनी फिर्यादीला अडविले.
आमच्या पायाला लागले आहे असे म्हणत खर्च म्हणून दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर फिर्यादीला मारहाण करून त्याच्याकडील दोन मोबाईल हिसकावून शिंदे आणि साथीदार पसार झाले. घाबरलेल्या दुचाकीस्वाराने पोलिसांकडे तक्रार दिली.
सहकारनगर पोलिस ठाण्यातील हवालदार अमोल पवार आणि अमित पद्मनाळे अरण्येश्वर परिसरातील ट्रेझर पार्क भागात 8 ऑगस्ट रोजी गस्त घालत होते. त्या वेळी आरोपी शिंदे आणि अल्पवयीन साथीदार तेथे थांबले होते. तिघांनी सातारा रस्त्यावर दुचाकीस्वाराला लुटल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी त्यांना पकडले. आरोपींकडून 25 हजारांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार, निरीक्षक सुरेखा चव्हाण, उपनिरीक्षक सद्दामहुसेन फकीर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.