

बार्शी : शेत नांगरणीच्या कारणावरून तिघांनी मिळून एका शेतकर्यावर हल्ला करून लोखंडी रॉड व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील रुई येथे घडली. गंभीर जखमी शेतकर्यावर सध्या बार्शी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वैराग पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर भगवान भोसले (वय 40, रा. रुई, ता. बार्शी) असे जखमी शेतकर्यांचे नाव आहे. आनंद बाबासाहेब चाबुकस्वार, समर्थ बाबासाहेब चाबुकस्वार, बाबासाहेब गुणाजी चाबुकस्वार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. भोसले हे आपल्या शेतातून घरी जात असताना गावातील या तिघांनी त्यांच्यावर हल्ला केला. महादेव मंदिरासमोर रस्त्यावर उभे असलेल्या या तिघांपैकी आनंद व समर्थ यांच्या हातात लोखंडी रॉड तर बाबासाहेबच्या हातात लाकडी काठी होती.
‘तू नागनाथ वसंत भोसले यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी का करू दिली नाहीस? तुला माज आला आहे काय ? असे म्हणत शिवीगाळ करत ज्ञानेश्वर भोसले यांच्या पाठीवर, नडगीवर, डोक्यावर आणि इतर अंगावर जोरात मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पुतण्या रोहित भोसले यालाही आनंद चाबुकस्वार याने रॉडने पोटात व पाठीवर मारहाण केली. त्यालाही शिवीगाळ करण्यात आली.