देहूरोड : कॅन्टोन्मेंट समावेशाचा अहवाल ‘नगर विकास’ला सुपूर्द

देहूरोड : कॅन्टोन्मेंट समावेशाचा अहवाल ‘नगर विकास’ला सुपूर्द
Published on
Updated on

देहूरोड(पुणे); पुढारी वृत्तसेवा : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने महापालिका अथवा नगरपालिकेमध्ये समावेशाचा आपला अहवाल नगर विकास विभागाला सुपूर्द केला आहे. हा विभाग त्यावर विचारविनिमय करून अहवाल संरक्षण मंत्रालयाला पाठवणार आहे. देशात 62 कॅन्टोन्मेंट बोर्ड असून वस्तू व सेवाकर लागू झाल्यापासून बोर्डाचे आर्थिक उत्पन्न समाप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर या कॅन्टोन्मेंट बोर्डाचा नजीकच्या नगरपालिका किंवा महापालिककेत समावेश करावा, याबाबत केंद्र सरकारने चाचपणी सुरू केली आहे.

यासंदर्भात केंद्र सरकारने एक समिती गठीत केली होती. या समितीकडे कॅन्टोन्मेंट बोर्डाने दोन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे सांगितले होते. त्यानुसार, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने अहवाल तयार केला असून त्यात नकाशा, जमिनीचा प्रकार, खासगी क्षेत्र आदी माहिती भरून अहवाल नगर विकास मंत्रालयाकडे सुपूर्द केला आहे. त्याच्या कॉपी एमओडी आणि भारत सरकार यांच्याकडे पाठवण्यात आल्या आहेत.

नगर विकास खात्याने या अहवालाचे अध्ययन करून तो संरक्षण मंत्रालयाकडे 30 जुलैपर्यंत पाठवावयाचा आहे. त्यानंतर, वरिष्ठ पातळीवरती एक बैठक होणार आहे. या बैठकीत कॅन्टोन्मेंट बोर्ड नगरपालिकेत समाविष्ट करावे की नाही, याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंटमधून मात्र नागरिकांमध्ये आतापासूनच हालचाली दिसून येत आहेत.

शेलारवाडी, कुंडमळा, चिंचोली, झेंडेमळा, मामुर्डी या गावातून चिंचोली गावाचा विरोध वगळता सर्व गावांनी महापालिकेत जाण्यास सकारात्मकता दर्शवली आहे, तर आंबेडकरनगर, गांधीनगर, शितळानगर, नायडूनगर, लक्ष्मीनगर, इंदिरानगर, पारशी चाळ आदी झोपडपट्ट्यांनी महापालिकेत समावेशास सकारात्मकता दर्शविली आहे. थॉमस कॉलनी, पोलिस वसाहत, दत्तनगर, सिद्धिविनायक नगरी, इंद्रपुरम आदी वसाहतींमधून संमिश्र प्रतिक्रिया आहेत; मात्र ही प्रक्रिया खूप लांबवर असल्याने देहूरोडकरांना अजून वाट पहावी लागणार आहे. पुणे जिल्ह्यातील पुणे खडकी आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट पैकी देहूरोड कॅन्टोन्मेंट हे अहवाल पाठवणारे जिल्ह्यातील पहिले कॅन्टोन्मेंट बोर्ड ठरले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार देहूरोड बोर्डाचा खासगी जमिनीचा अहवाल तयार करून काल हा अहवाल नगर विकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.

– राजन सावंत कार्यालय अधीक्षक, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news