

पुणे: वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी गांजाच्या आहारी गेलेल्या अरुणच्या (नाव बदलले आहे) कथेने आजच्या समाजातील चिंताजनक व धक्कादायक वास्तव समोर आणले आहे. मित्रांच्या संगतीत लागलेले व्यसन त्याच्या आयुष्यावर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या परिणाम करू लागले. कुटुंबीयांनी त्याला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले. उपचारांनंतर काही काळ तो व्यसनमुक्तही झाला. मात्र, जुन्या मित्रांच्या सहवासामुळे आणि त्यांच्या अनुकरणातून तो पुन्हा गांजाच्या विळख्यात अडकला. सध्या तो पुन्हा उपचार घेत असून, या केंद्रात त्याच्यासारखे अनेक तरुण आज व्यसनमुक्त होण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पुणे शहरातील विविध वस्त्या, तेथील पानटपऱ्या व अनेक छोट्या-मोठ्या दुकानांतून गांजा आणि इतर अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याची बाब सामाजिक संस्था आणि व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अधोरेखित केली आहे. विशेषतः १८ ते ४० वयोगटांतील तरुण-तरुणी आणि किशोरवयीन मुलांमध्ये गांजाच्या व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मात्र, अनेक तरुण आज सामाजिक संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या जनजागृती उपक्रमात सहभागी होत असून, व्यसनमुक्ती केंद्रात उपचारही घेत आहेत. त्यामुळे समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यसनमुक्ती केंद्र तरुणांसाठी आशेचा किरण ठरत आहेत.
मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालक मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, की गांजाचे व्यसन लागत नाही किंवा त्याचे दुष्परिणाम होत नाहीत, हा गैरसमज तरुणांमध्ये वाढताना दिसत आहे. काही देशांमध्ये त्याला कायदेशीर मान्यता असल्याने त्याचा वापर सुरक्षित असल्याचा समज तरुणांमध्ये निर्माण झाला आहे. त्यांना व्यसनापासून रोखून उपचारांसह मानसिक आधार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आमच्या केंद्रात व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना व्यसनमुक्त करण्यासाठी शारीरिक, तसेच मानसिक उपचार दिले जात आहेत. विविध थेरपी, समुपदेशन आणि सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब यांद्वारे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला जात आहे. तसेच, त्यांना पुन्हा सक्षम, स्वावलंबी आणि जबाबदार जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे, असे त्यांनी सांगितले.
आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष अजय दुधाणे म्हणाले, की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह शाळकरी मुलांमध्येही गांजाच्या व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. चुकीची संगत, चित्रपटांत दाखवली जाणारी दृश्ये, अनुकरणाची प्रवृत्ती आणि दिशाभूल करणारी माहिती यामुळे अनेक तरुण या मार्गाकडे वळत आहेत. गांजाचा परिणाम केवळ शरीरावरच नव्हे, तर मानसिक आरोग्यावर अधिक गंभीर होत असून, त्यामुळे अनेक तरुण कुटुंबापासून दुरावतात, शिक्षण आणि करिअरवर परिणाम होतो, असे त्यांनी नमूद केले. समुपदेशन, मानसशास्त्रीय उपचार आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून अनेक तरुणांना व्यसनमुक्त करण्यात यश आले असून, सध्या आपल्या केंद्रात २५ जण उपचार घेत आहेत. व्यसनाधीन व्यक्तीला दोष देण्यापेक्षा त्याला समजून घेणे, योग्य माहिती देणे आणि वेळेत उपचार उपलब्ध करून देणे अधिक गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
व्यसनापासून दूर राहण्यासाठी काय करावे?
गांजासह अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती द्यावी.
संवाद आणि समुपदेशनावर भर द्यावा.
व्यसनाधीनता दिसताच तातडीने उपचार घ्यावेत.
वैज्ञानिक आणि खरी माहिती तरुणांपर्यंत पोहोचवावी.
कला, वाचन, क्रीडा आणि इतर सकारात्मक छंदांमध्ये गुंतवावे. मानसिक ताणतणाव ओळखून वेळेवर मदत उपलब्ध करून द्यावी.