उमेदवारांची रक्कम स्वीकारणार नाही; पुणे बार असोसिएशन

उमेदवारांची रक्कम स्वीकारणार नाही; पुणे बार असोसिएशन

पुणे : पुणे बार असोसिएशनच्या तात्पुरत्या सभासदांच्या वार्षिक शुल्काची इच्छुक उमेदवारांनी जमा केलेली रक्कम न स्वीकारण्याचा निर्णय सोमवारी (दि. 4) असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या दोन उमेदवारांनी धनादेश तसेच आरटीजीएसद्वारे तात्पुरत्या सभासदांच्या वार्षिक शुल्कापोटी साडेसहा लाख रुपये असोसिएशनकडे सादर केल्याचे वृत्त दैनिक 'पुढारी'ने प्रकाशित केले. त्यानंतर, असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी तात्काळ बैठक घेत इच्छुकांनी दिलेली रक्कम न स्वीकारण्यासह आजपासूनच (दि. 5) तात्पुरती सभासद नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला.

शहरातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या तात्पुरत्या सभासद नोंदणी प्रक्रियेनुसार आज (दि. 5)पासून सुरुवात होणार आहे. 22 डिसेंबरपर्यंत सभासदांना नोंदणी करता येणार आहे. संबंधित सभासदांना असोसिएशनच्या कार्यालयात स्वतः हजर राहून सभासद फॉर्म दाखल करणे अनिवार्य असणार आहे. कोणत्याही सभासदाला इतर व्यक्तींमार्फत नोंदणी फॉर्म जमा करता येणार नाही. हे नोंदणी शुल्क बार असोसिएशनच्या खात्यावर रोख स्वरूपात जमा करून त्याची पावती नोंदणी फॉर्मसोबत जोडणे आवश्यक असणार आहे.

याखेरीज, शुल्काची रक्कम बार असोसिएशनच्या खात्यामध्ये ऑनलाइन पद्धतीनेसुद्धा भरता येईल व अशाप्रकारे भरणा केलेल्या रकमेचा स्क्रीन शॉट काढून त्याची प्रिंट आऊट अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. नोंदणी शुल्क हे रोख स्वरूपात बार असोसिएशनच्या कार्यालयात स्वीकारले जाणार नाही तसेच नोंदणी अर्जासोबत 2 पासपोर्ट साइज फोटो व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी दिलेल्या ओळखपत्राची झेरॉक्स जोडणे आवश्यक असल्याचे असोसिएशनतर्फे सांगण्यात आले.

निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी जमा केलेली रक्कम कोणत्याही चुकीच्या अथवा आमिषाच्या हेतूने केली नव्हती. पूर्वीपासून चालत आलेल्या पद्धतीनुसार इच्छुकांनी ती रक्कम जमा केली होती. मतदार यादी सोपी व सर्वांसाठी सोयीस्कर व्हावी, हा त्यामागचा हेतू होता. बारमधील काही मंडळींनी याला विरोध दर्शविल्याने नव्याने नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वकिलांची संख्या वाढत असून, निवडणुका सुलभ होण्याच्या दृष्टीने बैठकीत तात्पुरत्या सभासदांची तत्काळ नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

– अ‍ॅड. केतन कोठावळे, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन.

बार असोसिएशनने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे स्वतःच्या मर्जीतील मतदारांची सभासद नोंदणी करून निवडणूक जिंकणे या गोष्टींना आळा बसून हे प्रकार थांबतील. ज्या तात्पुरत्या सभासदांना बारसाठी मतदान करण्याची इच्छा आहे तसेच ज्यांना बारचे हित पाहिजे, असे सर्वसामान्य मतदार या निवडणूक प्रक्रियेमध्ये स्वतःहून सहभागी होतील. निवडणूक प्रक्रिया अतिशय सोपी असावी हीच अपेक्षा आहे. निवडणुकीला कमी दिवस राहिले असून, सभासद नोंदणीची मुदत आणखी वाढविण्यात यावी.

– अ‍ॅड. हेमंत झंजाड, माजी उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news